वाहतूक नियम मोडणाऱ्या ऊस वाहक चालकावर कडक कारवाईची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : परिसरतील साखर कारखाने सुरु झाले असून त्यांची ऊस वाहतूक शेवगाव शहराच्या मध्यवस्तीतून होते. दोन-दोन ट्रॉल्या लावलेल्या जुगाडाने ही ऊस वाहतूक होताना वरचेवर वाहतूक कोंडी होणे, भर चौकात ट्रॅक्टर पलटी होऊन ऊसाचे नुकसान होणे, अपघात होऊन एखाद्या निरपराधींचा बळी जाणे असल्या घटना वरचेवर घडत असतात. अशी घटना घडली नाही, असा दिवस जात नाही.

साखर कारखाने, पोलिस प्रशासन, आरटीओ विभागाने यात लक्ष घालून या घटना रोखण्यासंदर्भात मार्ग काढला पाहिजे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. साखर कारखान्याचा हंगाम सुरु झाला की, तालुक्याच्या परिसरातील गंगामाई, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर व केदारेश्वर साखर कारखान्या व्यतिरिक्त तालुक्याबाहेरील अन्य साखर कारखान्याकडे शेवगाव शहरातून रात्रन दिवस ऊसाची जुगाड ट्रॅक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.

सध्या तर दिपावली सणामुळे शेवगाव बाजार पेठेसह शहरातील सर्वच चौक व प्रमुख रस्ते गर्दीने फुलले आहेत. त्या अवजड वाहतूक करणाऱ्या डबल ट्रॉली ट्रॅक्टरने ऊस वाहतूक करणारी वाहने ऐन गर्दीच्या वेळी बंद पडण्याच्या घटनामुळे बराच वेळ वाहातूक कोंडी होत असल्याने त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

यासंदर्भात डबल ट्रॉली जुगाडाच्या वाहनांना दिवसा ऊस वाहतूक करण्यास मनाई करण्यात यावी. तसेच या वाहनाना रिफ्लॅक्टर लावलेले असावेत. चालकाने गाणी लावून वाहन चालवू नये. ऊस वाहन पलटी झाल्यास रस्त्यावर ऊस पडून ऊसाचे नुकसान झाल्यास शेतकर्‍याच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी वाहतूक दारावर टाकावी. तसेच वाहतूक पोलिस व आरटीओ विभागाने नियम मोडणारावर कडक कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरातील गुरुवारी दुपारी आंबेडकर चौकातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर ऊसाचे डबल ट्रॉली ट्रॅक्टर बंद पडल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. तर दोन दिवसापूर्वी नेवासे रस्त्यावरील भातकुडगाव फाटया जवळ काळेगाव पुलावर डबल ट्रेलर उलटून वाहातूक कोंडी झाली. यावेळी ट्रॅक्टर मधील बराच ऊस रस्त्यावर पडून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

अशा वेळी रस्त्यावर पडलेला ऊस गोळा करून घेण्याचे सौजन्य देखील चालक दाखवित नाहीत. यावेळी देखील रस्त्यावर पडलेला ऊस चक्क जेसीबीने नदीत दोन्ही बाजूला ढकलून वाहतूक सुरळीत करण्यात आली. वाहनात क्षमते पेक्षा अधिक ऊस भरणे, भरधाव वेगात वाहन चालविणे, वाहन सुरक्षित नसणे अशा कारणाने प्रमुख रस्त्यावर ही ऊसाची वाहने बंद पडण्याच्या घटना रोजच सुरु आहेत.