शेवगाव बसस्थानकाचे काम कासव गतिने सुरु, प्रवाशांचे हाल

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : येथील नवीन बस स्थानकाचे काम कासव गतिने सुरु असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. बसण्याची पुरेसी व्यवस्था नाही. ऊनवारा, पावसा पासून संरक्षणासाठी असलेले  तुटपुजे छत असून नसल्या सारखे आहे. स्थानकात सर्वत्र खड्डे असून अल्पशा पावसाने सर्वत्र डबकी साचतात तर अन्य वेळेस बस आली की सर्वत्र धुराळा उडत असतो. तरीही प्रवाशाना जीव मुठीत धरून थांबावे लागते. अशा स्थितीत प्रवाशाना बस स्थानकाचे आच्छे दिन कधी पहावयास मिळणार असा सवाल त्रस्त प्रवाशी करत आहेत.

      सन १९५२ ला शेवगाव आगर नगर जिल्ह्यात सर्व प्रथम सुरु झाले असून मराठवाड्याला जोडणारे मध्यवर्ती केंद्र म्हणून शेवगावची ओळख असून  शेवगाव बसस्थानकात प्रवाशाची मोठी गर्दी असते. या आगारातून दिवस भरात तालुक्याच्या ग्रामीण भागासह पुणे नाशीक, औरगाबाद, बारामती, कोल्हापूर, त्र्यंब्यकेशवर, परळी- वैजनाथ आदि लांब पल्याच्या जवळपास २५० वर बस गाड्याची वर्दळ असते. त्यातून दररोज सुमारे २५ – ३० हजार प्रवासी प्रवास करतात.

  मागील जून महिन्यात शेवगाव आगारास २ कोटी ९६ लाख रुपयाचे विक्रमी उत्पन्त मिळाले आहे. अधिकारी कर्मचार्‍याच्या सामुहिक प्रयत्नातून देखभाल दुरुस्ती खर्चात काटकसर केल्याने आगाराची तीन लाख रुपयाची बचत झाली आहे. ही बाब आगारातील अधिकारी व कर्मचार्‍यांना भूषणावह आहे. तरी गेल्या तीन वर्षा पासून बसस्थानकाचे कामास रखडल्याने प्रवाशांची तीव्र नाराजी आहे.

     येथील बस स्थानकात बसण्यासाठी बाके उपलब्ध नसल्याने अनेकांना ऊन, वारा, पावसात तिष्ठत उभे रहाण्याची पाळी येते. तसेच डेपोतून आलेली बस जेथे मोकळी जागा उपलब्ध असेल तेथे लागत असल्याने ती नेमकी कोठे जाणार याची खात्री नसल्याने बस बाहेर आली की,  ती पकडण्यासाठी  प्रवाशांच्या झुंडी त्या बस मागे पळत असतात. शाळा सुटत्यानंतर बसस्थानकाला तर यात्रेचे स्वरूप येते. शाळकरी मुले व प्रवासी थेट डेपोत घुसून बाहेर येणाऱ्या बसमागे पळतात. अशा वेळी वृद्ध, महिलाचे  मोठे हाल होतात.

बहुतेक बसेस वेळेवर सुटत नाहीत. त्यातच मध्यंतरीच्या कोव्हीड काळात व संप काळात दीर्घ काळ बसेस दीर्घकाळ एका जागेवरच उभ्या होत्या. शिवाय  बहुतेक बसेस कालबाह्य झाल्या असल्याने लागलेली बस वीना तक्रार इप्सीत स्थळी निश्चित वेळेत पोहचतील असा भरवसा नाही. अशी स्थिती असल्याने अनेक बसेस रस्त्यात बिघाड झाल्याने थांबलेल्या आढळतात परिवहन महामंडळाने शेवगाव आगारास किमान दहा नव्या बसेस देण्याची व्यवस्था करावी आणि दीर्घ काळ रेंगाळलेले विक्रमी उत्पन्न देणाऱ्या शेवगाव बस स्थानकाचे काम त्वरित मार्गी लावावे अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.