वारी परिसरातील चोऱ्यांचा तातडीने तपास लावा – मच्छिंद्र टेके

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : कोपरगाव तालुक्यातील वारी गावात व परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांत वारी येथे पाच-सहा चोरीच्या घटना घडल्या असून, त्याचा तपास अद्यापही लागलेला नाही. पोलिसांनी याची तात्काळ दखल घेऊन वारी गावात झालेल्या चोऱ्यांचा तातडीने तपास लावून आरोपींवर कडक कारवाई करावी. तसेच चोऱ्या रोखण्यासाठी उपाययोजना करावी यासाठी वारी ग्रामस्थांनी माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांचेकडे व्यथा मांडली असता सदर विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची सूचना कोल्हे यांनी संबधिताना केली आहे.

मागील काही दिवसांत वारी गावात चोरीच्या चार-पाच घटना घडल्या आहेत; परंतु पोलिस अद्यापपर्यंत एकही चोरीच्या गुन्ह्याचा तपास लावू शकले नाहीत. घरफोडी व चोरीच्या घटना वाढल्यामुळे वारी येथील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पोलिसांनी यासंदर्भात गांभीर्याने कारवाई करण्याची गरज आहे असे कोपरगाव पंचायत समितीचे सभापती मच्छिंद्र टेके यांनी माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली. त्यावर स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव तालुका (ग्रामीण) पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना वारी व परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या चोरीच्या घटनांचा त्वरित तपास लावून यापुढे चोरीच्या घटना घडू नये यासाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत चर्चा केली आहे.

वारी गावात गेल्या काही दिवसांत नवनाथ पवार, सांगळे, ज्ञानेश्वर टेके, पवार, काजळे यांच्या घरी चोऱ्या झाल्या. चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल लंपास केला. ८ जुलै रोजी वारी येथील ज्ञानेश्वर चांगदेव टेके यांच्या वस्तीवर चोरी झाली. या घटनेत चोरटे ज्ञानेश्वर टेके यांच्या घरातून किमती ऐवज घेऊन पसार झाले. चोरीच्या घटना वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. विशेषतः शेतवस्तीवर राहणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोर भरदिवसा लोकांच्या घरात घुसून किमती ऐवज लुटून नेत आहेत. तातडीने शोध लागून कारवाई होत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे दिसून येत आहे. गावात चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी येतात, पंचनामा करतात मात्र बरेच दिवस उलटूनही निष्पन्न काही होत नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

पोलिसांनी वारी व परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या चोऱ्यांचा तातडीने तपास लावावा आणि चोऱ्या रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करावी, अन्यथा जनआंदोलन करण्याचा विचार ग्रामस्थ करत आहेत. जनतेच्या संतापाचा उद्रेक होण्याअगोदर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे आणि वारी गावात गेल्या काही दिवसांत घडलेल्या चोऱ्यांचा तातडीने छडा लावून आरोपींवर कडक कारवाई करावी तसेच चोऱ्या व इतर गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी सूचना स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.