शिर्डी – पंढरपुर रेल्वे तातडीने सुरू करावी – वारक-यांची मागणी 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३१ : शिर्डी आणि पंढरपुर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारी रेल्वेगाडी अचानकपणे बंद झाल्याने वारकरी भक्तांसह प्रवाशांनी ही रेल्वेगाडी तातडीने सुरू करावी या मागणीचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांना दिले असुन त्यांनीही रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवुन मागणी केली आहे. 

 बाजीराव शिंदे, रामकृष्ण गुरव, राजेंद्र वाबळे, ह. भ. प. दशरथ उर्किडे, ह. भ. प. गणपत महाराज लोहाटे, ह. भ. प. दत्तात्रय महाराज जोर्वेकर, ह. भ.प. धोंडीराम महाराज टेंगळे यांच्यासह अन्य वारकरी बांधव व प्रवाशांनी याबाबत निवेदन दिले असुन तमाम महाराष्ट्रवासियांचे आराध्य दैवत असलेले विठोबा रूक्मीणीचे दर्शन यानिमीत्ताने होत होते.

आंतरराष्ट्रीय देवस्थान साईबाबांची शिर्डी आणि पंढरपुर ही दोन तीर्थस्थाने रेल्वेने जोडली होती मात्र दररोज धावणारी सदरची रेल्वेसेवा बंद असल्याने वारकरी बांधवासह प्रवाशांची मोठया प्रमाणांत गैरसोय होत आहे. ही गैरसोय दुर करावी व पुन्हा शिर्डी ते पंढरपुर रेल्वेगाडी सुरू करून प्रशासनाने वारक-यासह सर्व प्रवाशांना दिलासा द्यावा असेही निवेदनकर्त्यांनी शेवटी म्हटले आहे.

साईबाबांची शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असुन येथे रेल्वेने दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात पण सदरची रेल्वे बंद असल्यांने त्यांची गैरसोय होत आहे, तर अन्य व्यावसायिकांचेही यामुळे नुकसान होत आहे त्याबाबत भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी स्थानिक पातळीसह रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवुन ही सुविधा तात्काळ सुरू करून वारक-यांना दिलासा द्यावा असे म्हटले आहे.