कोपरगाव मतदार संघाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : राज्यात बहुतांश तालुक्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून एकूण चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. मात्र, कोपरगाव मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून देखील कोपरगाव मतदार संघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी राज्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या ४० तालुक्यांच्या यादीत कोपरगाव मतदार संघाचा देखील समावेश करावा. अशी मागणी कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून महायुती शासनाने मतदार संघाचा देखील दुष्काळाच्या यादीत समावेश केला, असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यानी दिली आहे.

पर्जन्यछायेखाली येत असलेल्या मतदार संघात दरवर्षी पेक्षा यावर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. सलग दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भू-गर्भाची पाणी पातळी खालावली गेली असून हिवाळा नुकताच सुरु झाला असतांनाच पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहे. त्यामुळे भविष्यात किती बिकट परिस्थिती असू शकते याचा अंदाज येत आहे.

त्यामुळे मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्यात येवून त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दुष्काळाच्या सोयी सुविधा मिळतील असा अंदाज होता. परंतु कोपरगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या शेजारील येवला व सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. मात्र, दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून देखील दुष्काळ जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे २०१८ प्रमाणे पुन्हा एकदा मतदार संघावर अन्याय होतो की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

परंतु मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी पुन्हा मतदार संघावर अन्याय होणार नाही. याची काळजी घेवून मतदार संघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्याची मागणी करून त्याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून. आ. आशुतोष काळे यांनी मांडलेल्या कोपरगाव संघातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून गुरुवार (दि.०९) रोजी वॉर रुममध्ये झालेल्या मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहेगाव बोलका, पोहेगाव व पुणतांबा या मंडलामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

 त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना जमीन महसुलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्ज वसुलीत स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात  ३३.५ टक्के सूट, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, शेतकऱ्यांची शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

आदी सोयी सलती आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव तालुक्याला मिळणार असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या वतीने आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे, मदत पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांचे आभार मानले आहे.