शेवगावत दारू बंदीसाठी रास्तारोको आंदोलन

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : दारू बंदीची मागणी करून देखील दारू बंदी होत नसल्याने तालुक्यातील राक्षी येथील महिलांनी शेवगाव बोधेगाव रस्त्यावर गुरुवारी सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. सपोनी आशिष शेळके यांनी सकारात्मक आश्वासन दिल्या नंतर आंदोलनकर्त्या महिलांनी आंदोलन आटोपते घेतले. तथापि चार दिवसात गावातील सर्व अनधिकृत दारू विक्री बंद करावी अन्यथा पुन्हा वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त महिलानी दिला.

राक्षी या छोट्याशा खेड्यात चक्क सात घरातून अनधिकृतपणे देशी दारू विक्री केली जाते. दारुच्या नादी लागून गावातील अनेक कुटूंब रसातळाला जाऊन उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व गावातील अनेक महिला युवक वर्ग या आंदोलनात सहभागी झाला होता. घरात सुरू असलेला गोंधळ आणि दारिद्र्य हे दारूमुळेच आहे.

यामुळे शाळकरी मुलांनी व महिलांनी पोलीस निरीक्षक व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. मात्र, यावर कुठलीही कारवाई न झाल्याने शेवगाव गेवराई रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते आटोपते घेण्यात आले.

या वेळी रेखा झुंबड, मनीषा झुंबड, वैशाली झुंबड, मीरा गव्हाणे, योगिता कातकडे, नंदा झुंबड, सुमन जगधने, छाया शेळके, अलका झुंबड, शशिकला झुंबड, कुसुम बेलुरे, मालन लाड, रंभा गाडे, मुक्ता कातकडे, हिरा गाडे, रेखा मगर, द्वारका झुंबड, संजीवनी झुंबड, स्वाती वाघ, मीना शेळके, गया बागडे, सुमन खेडकर, रुक्मिणी गाडे आदी अनेक महिला आंदोलनात सहभागी होत्या.