कोपरगाव नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचा १४ मार्च पासून बेमुदत संप

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याबाबतचे निवेदन आज कोपरगाव नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी यांनी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना दिले.  

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, राज्य संवर्ग कर्मचारी, स्थानिक नगरपरिषद कर्मचारी व रोजंदारी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांना निवेदन दिलेले आहेत. तसेच मा.नगरविकास मंत्री यांचे सोबत बैठक होवूनही अद्यापपावेतो नगरपरिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी यांच्या सोबत जोडलेल्या मागण्या प्रलंबित आहेत. तरी संबंधित मागण्या संदर्भात सर्व संघटना मार्फत वेळोवेळी निवेदन सादर करून विनंती करूनही शासनाने अद्याप पावेतो मागण्यांबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही.

 सर्व संघटनांनी एकत्रित येवून महाराष्ट्र राज्य नगरपालिका महासंघ तयार केलेला आहे. मागण्यांवर कोणताही निर्णय होत नसल्याने नाईलाजास्तव दि.13/03/2023 रोजी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करून दि.14/03/2023 पासून  कोपरगांव नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी बेमूदत संपावर जात आहेत, अशा आशयाचे निवेदन आज कोपरगाव नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी यांनी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना देण्यात आले. 

यावेळी अहमदनगर जिल्हा संवर्ग संघटना कार्याध्यक्ष श्रीमती पल्लवी सूर्यवंशी, नगरपरिषद संवर्ग संघटनेचे उपाध्यक्ष तुषार नालकर, अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष पवन हाडा तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.