शेवगाव सोमवारी दिवसभर कडकडीत बंद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत सोशल मीडियावर अवमानकारक मजकुर प्रसारीत

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत सोशल मीडियावर अवमानकारक मजकुर प्रसारीत केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या शेवगाव  बंदला तमाम जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आज सोमवारी दिवसभर कडकडीत बंद पाळला.

      शहरातील  छोट्या मोठ्या व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेऊन या घटनेचा निषेध नोंदवीला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निघालेल्या मोर्चात भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, सुनील रासने, डॉ.नीरज लांडे पाटील, नगरसेवक महेश फलके, युवा कार्यकर्ते अजिंक्य  लांडे पाटील, अमोल घोलप, जगदीश धूत, किरण  काथवटे, अमोल माने,  सुरज कुसळकर, शिवसेनेचे जिल्हा युवा प्रमुख साईनाथ आधाट,

तालुका प्रमुख आशुतोष डहाळे, चंद्रकांत महाराज लबडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, रोहित काथवटे,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी काटे, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष शितल पुरनाळे, मनसेचे तालुकाप्रमुख गणेश रांधवणे यांचेसह शहरातील हजारो शिवप्रेमी नागरिकांसह विविध संस्था संघटना व तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पक्षीय प्रमुख नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने महाआरतीमध्ये सहभागी झाले होते.

क्रांती चौकातील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर व शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महाआरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

      अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती.