कोपरगांव प्रतिनिधी, दि. २ : तत्कालीन आमदार व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांच्या स्थानिक विकास निधी तसेच विविध शासकीय योजनेतुन दहेगांव बोलका, टाकळी, ब्राम्हणगांव, येसगांव, सुरेगांव, करंजी, रांजणगांव देशमुख, शिरसगांव, वारी, तळेगांवमळे, कोकमठाण, खोपडी, उक्कडगांव, घोयेगांव, शिंगणापुर, शहापुर, आणि जेउरपाटोदा या सतरा गावात सन २०१९ मध्ये प्रत्येकी २५ व १० लाख रूपयांची सामाजिक सभागृहांची कामे मंजुर होवुन चार वर्षे होत आली.
परंतु प्रत्येक बैठकीत चौकशी करून सांगतो असे एकच साचेबंद उत्तर ऐकायला मिळत आहे तेंव्हा याबाबत प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी स्तरावर उपोषण करावे का असा संतप्त सवाल जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी तहसिलदार विजय बोरूडे यांना केला. ही सामाजिक सभागृहे यापुर्वीच तयार झाली असती तर आदिवासी, अल्पसंख्यांक, गोर गरीबांचे विविध कार्यक्रम त्यात संपन्न झाले असते आणि त्यांनी शासकीय अधिका-यांना दुवाही दिला असता असेही ते म्हणाले.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसिल कार्यालय कोपरगांव येथे जनतेच्या प्रलंबित कामासाठी जनता दरबारचे आयोजन केले जाते त्यात विवेक कोल्हे बोलत होते. संबंधीत ठेकेदारांना काळया यादीत टाकावे. गोर गरीबांसाठी केंद्र व राज्य शासन स्वस्त धान्य पुरवठा करते पण ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यापासून त्याचे वितरण होत नाही, हा माल काळया बाजारात विकुन गोर गरीबांना स्वस्त धान्यापासून वंचित ठेवल्याच्या प्रचंड तक्रारी पुराव्यानिशी आपल्याकडे आल्या आहेत तेंव्हा मतदारसंघातील नागरिकांना तात्काळ स्वस्त धान्याचा पुरवठा व्हावा, नविन दुबार रेशनकार्डसाठी स्टेशनरीचे कारण सांगून अडवणुक होते त्यात संबंधीत यंत्रणे तात्काळ लक्ष घालून समस्येचे निराकारण करावे असेही ते म्हणाले.
कोल्हे पुढे म्हणाले की, जनता दरबारात वचितांच्या समस्या सोडविण्यांसाठी विशेष प्राधान्य दिले. गेल्या आठ महिन्यापासून आम्ही कोपरगांव शहरासह संपूर्ण विधानसभा मतदार संघात समाजाच्या विकासासाठी प्रलंबित असणारे प्रश्न पोटतिडकीने मांडतो मात्र त्यावर ठोस कार्यवाही होत नसेल तर मग वेगळया मार्गाने प्रश्न हाताळावे लागतील असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
लोकशाहिर अण्णाभाउ साठे बंदिस्त नाटयगृहासाठी जागा आणि निधी मंजूर असतांनाही हे काम का सुरू होत नाही असा सवाल भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, विनोद राक्षे यांनी केला. अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष पराग संधान म्हणाले की, शहरात अस्वच्छ पिण्यांच्या पाण्याचा पुरवठा होत आहे त्यातुन रोगराई वाढते आहे, जी रस्त्यांची कामे सुरू आहेत त्याचा दर्जा बेसुमार आहे., विरोधकांच्या कामाला एका रात्रीतुन तांत्रीक मान्यता दिली जाते तर दुसरीकडे विकासाचे काम कोल्हे कुटूबियांनी अडविले म्हणून राजकीय टिका टिप्पणी केली जाते, मग यापाठीमागेही राजकीय हात आहे काय, शहरवासियांच्या समस्या मुख्याधिका-यांनी स्वतंत्र वेळ द्यावा असेही ते म्हणाले.
डाउच बुद्रुक येथील सामाजिक सभागृहासमोर दांडगाईने अतिक्रमण करून दुग्ध व्यवसाय चालविला जात आहे त्याच्या लेखी तक्रारी करूनही न्याय मिळत नाही असे बाबा दहे म्हणाले. समृध्दी महामार्गाचे काम पुर्णत्वाकडे आले पण कोपरगांव तालुक्यातील ११ गावातुन यासाठी जमिन संपादित करण्यांत आली तेथील शेतक-यांचे पाटपाण्यांचे व चा-यांचे तसेच सायफनचे प्रश्न ठेकेदार मंडळी करत नाही त्यांच्यावर कुणी राजकीय दबाव टाकला आहे काय, मळेगांवथडी जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना कामासाठी मोजणीचा अर्ज देवुनही त्यावर कार्यवाही होत नाही असे सरपंच अनिता किरण उगले यांनी मांडला.
शेतक-यांना तसेच विविध ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनांना पुर्ण दाबाने वीजेचा पुरवठा करावा, जी रोहित्र खराब आहे ते दुरूस्त होवुन मिळावी, काही वीज रोहित्रांचे अपग्रेडेशन करावयाचे ते तातडीने करून द्यावे, बिबटे हिंस्व प्राण्यांचा वावर वाढल्यांने शेतक-यांना रात्री अपरात्री पिकांना पाणी देता येत नाही तेंव्हा दिवसा वीज द्यावी अशा तक्रारी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे संचालक ज्ञानदेव औताडे, माजी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, जनार्दन कदम, यांच्यासह उक्कडगांव, मळेगांवचडी, चांदगव्हाण, धारणगांव, ब्राम्हणगांव, टाकळी, वारी, रांजणगांव , देशमुख, मनेगांव आदि गांवच्या शेतक-यांनी मांडल्या.
ब्राम्हणगांव देवी मंदिराजवळील शौचालय व स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण आहे, सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये अतिवृष्टी होवुन शेतक-यांचे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले त्यायी विमा कंपन्यांनी तुटपूंजी भरपाई दिली, कासली, हिंगणी, वेळापूर स्मशानभूमीचे काम अपूर्ण आहे, शिंगणापुर आदिवासीसाठी दीड वर्षापासून वीज जोड मिळत नाही, आपत्ती व्यवस्थापन निधीतुन सोनारी संरक्षक भिंतीचे काम करावे, रवंदे ते मळेगांवथडी. झगडेफाटा ते रांजणगांव देशमुख, चांदेकसारे ते कुंभारी यासह विविध गावातील रस्त्यांचे कामे तात्काळ मार्गी लावावी, घरकुल ‘ड’ यादी फेर सर्व्हेक्षणात वंचितांना तात्काळ न्याय द्यावा, मनेगांव घरकुल लाभार्थ्याबाबत बोगस अहवाल देण्यांत आला असुन त्यात लक्ष घालून वंचितांना न्याय द्यावा आदि मागण्या करण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष शरद थोरात, विजय आढाव, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, दिपक चौधरी, कैलास राहणे, दत्तात्रय सावंत, राजेंद्र सोनवणे, बबलु वाणी, स्वप्नील निखाडे,संदिप देवकर, भिमा संवत्सरकर, शिंगणापुरचे सरपंच डॉ विजय काळे, करंजीचे सरपंच रविंद्र आगवण, विविध शासकीय, सार्वजनिक बांधकाम तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.