सुदृढ व निरोगी शरीर संपदा हा मनुष्याचा अनमोल ठेवा – पाचपोर महाराज

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : सुदृढ व निरोगी शरीर संपदा हा मनुष्याचा अनमोल ठेवा असून तो जोपासण्यासाठी प्रत्येकाने शुद्ध व सात्विक आहार, व्यायाम व कोणत्याही प्रकारचे व्यसन यापासून दूर राहून धार्मिक सदभाव वृद्धिगंत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य ह भ प संजय महाराज पाचपोर यांनी केले.

    आखेगाव येथील श्री जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक ह भ प राम महाराज झिंजुर्के यांनी सन १९१७ मध्ये  येथील कोरडेवस्तीवर  मोठ्या प्रमाणात आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाने अनेक विश्वविक्रम केले. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील करण्यात आली . हा सप्ताह  ३१ डिसेंबरला सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून श्री जोग महाराज शताब्दी प्रासादिक मंडळ ३१डिसेंबरला ‘ सुसंस्कार दिन ‘ म्हणून साजरा करते. सालाबाद प्रमाणे यावर्षीही या मंडळाने काल शनिवारी ३१ डिसेंबरला ‘सुसंस्कार दिना’ निमित्त ह भ प पाचपोर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन केले, यावेळी ते बोलत होते.

      पाचपोर महाराज म्हाणाले की, सध्याच्या युवापिढी मध्ये चंगळवाद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निराशजनक चित्र  आहे. त्यामुळे युवापिढीने सर्व प्रकारच्या व्यसनापासून कटाक्षाने दूर राहून वारकरी संप्रदायाची कास धरणे आवश्यक आहे. धार्मिक संस्कारातून परस्पर प्रेम भाव व दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती वाढीला लागते. सदगुण व सदविचारांची वाढ होवून जीवन सार्थकी लागते.  नवीन वर्षाचा शुभारंभ करतांना अविचाराने होणारे वाईट वर्तन रोखण्यासाठी समाजात संस्कार वाढीस लागावेत म्हणून  ह भ प राम महाराज झिंजुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जोग महाराज संस्कार केंद्राच्या वतीने आयोजित उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याची आवश्यकता व्यक्त करून शहरातील कोरडे वस्ती तरुण मंडळाने नवीन वर्षाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षापासून हाती घेतलेला समाज प्रबोधनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.

       यावेळी तीनशे टाळकऱ्यांसह श्री राम महाराज, सुनील रासने, ज्ञानदेव निमसे, योगेश कोरडे, किशोर धनवडे, पोपट डुकरे, विजय कर्डिले, श्रीधर गुंजाळ, बाळासाहेब केसभट आदींसह मंडळाचे पदाधिकारी सदस्य व परिसरातील भाविकांची केसभट वस्ती, डोईफोडे वस्ती, कर्डिले वस्ती, येथील भाविकांची मोठी उपस्थिती होती. मंडळाने नवीन वर्षाच्या निमित्ताने  आयोजित या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. माजी नगरसेवक गणेश कोरडे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. संदीप खराड यांनी आभार मानले.

       काल शनिवारी ३१ डिसेंबरला इतरत्र  युवा पिढीचा रंगीत संगीत पार्ट्यावर जोर असताना येथील कोरडे वस्तीवर श्री जोग महाराज शताब्दी प्रासादिक मंडळा मार्फत रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांचे कीर्तन आयोजित करणाऱ्या आणि पंचक्रोशीतील विविध भक्ती पिठातून तयार झालेल्या शेकडो युवा वारकऱ्यांच्या माध्यमातून परिसरावर संस्कार करणाऱ्या राम महाराजांच्या कार्याला नतमस्तक होऊन सलाम करावा असे हे कार्य आहे.