भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतूनच रामराज्य येऊ शकते -रामायणाचार्य ढोक महाराज

शेवगाव प्रतिनिधी , दि.२३ : रामराज्य केवळ भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतूनच येऊ शकते. त्यासाठी राज्यकर्त्यांनी समाज उपयोगी कामे करुन समाजाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवे असे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी येथे केले. शेवगाव येथील अयोध्या नगरीत माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त आमदार मोनिका राजळे यांच्या संकल्पनेतून स्व. राजीव राजळे मित्र मंडळ आयोजित श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता रावण वध व श्रीराम राज्याभिषेक उपक्रमातून झाली .

यावेळी रामायणाचार्य ढोक महाराज पुढे म्हणाले, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचे जीवन चरित्र विश्वातील मानवाला अतिशय प्रेरणादायी आहे.  श्रीराम चरित्रातील एक जरी गुण आपल्या जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न केला तर मनुष्याचे जीवन सार्थकी लागणार आहे. म्हणून प्रत्येकाने राम कथेतील सदगुणांचा अवलंब आपल्या जीवनात करावा. सज्जन समाज जोडण्याचे काम करतात तर दुर्जन समाज मोडण्याचे काम करतो. त्यामुळे सज्जनाच्या कार्याची समाजाने नोंद घेऊन त्यांना सतत सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.

जीवनात नम्रता आवश्यक असून या सद्गुणाचा प्रत्येकाने अवलंब करावा. समाजातील गरजू व गरिबांना मदत करावी. श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री, हरी महाराज घाडगे, गदेवाडीच्या मीना महाराज मडके यांच्यासह शेवगावातील गोविंदा युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते ग्रंथ पूजन व आरती करण्यात आली. आमदार राजळे यांनी कथेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. शेवटी उपस्थित हजारो भाविकाच्या हस्ते मेणबत्त्या पेटवून महाआरती करण्यात आली. भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले.