खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा २ तास रास्ता रोको

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : भाजपाचे  प्रदेश सचिव अरुण मुंडे व त्यांचे भाऊ उदय मुंडे यांच्यावर आकसाने दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा . पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना निलंबित करण्यात यावे. तसेच पदाचा गैरवापर करून खोटा जबाब देणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी १२ ते २ पर्यंत  येथील क्रांती चौकात तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

पोलीस निरीक्षक पुजारी यांना निलंबित केल्याचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी घेतल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून जिल्हा पोलीस प्रमुखांचा संदेश दिल्यानंतर पुकारण्यात आलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

     शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकातून निघालेला हा सर्वपक्षीय मोर्चा संत गाडगे महाराज चौक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलक क्रांती चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी  सर्व बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

      यावेळी मुंडे म्हणाले, शेवगाव पाथर्डी तालुक्यात स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत. चांगले काम करणाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचा काहीचा प्रयत्न असून तो कदापि यशश्वी होणार नाही, होऊ देणार नाही. ज्याच्यावर अन्याय होतो त्यांच्या बाजूने आपण ठामपण उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पो.नि. पुजारी यांनी काहींच्या इशार्‍यावर निरपराधींना अडचणीत आणल्याचे निदर्शनास आल्याच्या तक्रारी आपण  राज्याचे उपमुख्य मंत्री, पालकमंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे वारंवार केल्या. यामुळे आकसाने आपल्या विरुद्ध कारवाई केल्याचा दावा करून त्यांचा हिशेब केला जाईल. तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्याचा देखील हिशेब करु, असे ते म्हणाले.

      वंचितचे राज्य उपाध्यक्ष  प्रा.किसन चव्हाण म्हणाले, लोकांशी बांधिलकी असलेल्या कार्यकर्त्याचा आवाज कोणी ही दाबू शकत नाही. चांगले काम करणारा कार्यकर्ता तो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावरील अन्यायाच्या विरोधात आम्ही सर्व एक आहोत. असा संदेश या आंदोलनातून आम्ही देत असून नवीन पोलिस अधिकार्‍यांनी कोणाच्या इशार्‍यावर नव्हे तर सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे.

       यावेळी अरुण काळे, वजीर पठाण, संजय टाकळकर, आत्माराम कुंडकर , गणेश कराड, सुनिल काकडे, विलास फाटके, गोकूळ दौंड, बाळासाहेब सोनवणे, तुषार वैद्य, बाळासाहेब कोळगे आदिनी आपल्या भावना व्यक्त केल्या.