समाजाने महिलांचा आदर, सन्मान करावा – स्नेहलताताई कोल्हे 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : महिला हा माझा श्वास आहे. सर्वसामान्य महिलांची उन्नती हाच माझा ध्यास आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी महिलांसाठी, समाजासाठी झटत राहीन. ज्या घरात महिलांचा आदर, सन्मान होतो, तेथेच परमेश्वराचा वास असतो. तेच घर प्रगती करते. ज्या घरात महिलांचा सन्मान होत नाही, अन्याय होतो तेथे नेहमी दु:ख, दैन्य असते. स्त्री ही कुटुंबाचा भार सांभाळणारी व अनेक आव्हानांना तोंड देणारी एक आदिशक्ती जननी आहे. म्हणून समाजाने स्त्रीशक्तीची कदर केली पाहिजे. महिलांचा आदर, सन्मान केला पाहिजे, असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले.

Mypage

कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे शनिवारी (२१ ऑक्टोबर) रात्री संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने हिंदूरक्षक ग्रुपच्या सहकार्याने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ‘झी टॉकिज’ कलाकार संदीप जाधव यांचा सन्मान नारी शक्तीचा होम मिनिस्टर-खेळ मानाच्या पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

Mypage

अनिता कदम, सुनंदा कदम, प्रियांका कदम यांनी स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार केला. हिंदूरक्षक ग्रुपचे अध्यक्ष ऋषिकेश कदम, सार्थक खिल्लारे व सर्व सदस्यांचा स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक साहेबराव कदम, कोपरगाव बाजार समितीचे संचालक साहेबराव लामखडे, उपसरपंच संदीप कदम, शशिकांत सोनवणे, भाऊसाहेब घोटेकर, अनंत कदम, उमेश कदम, ग्रामसेवक बागले, सर्व ग्रा. पं. सदस्य, महिला बचत गट सदस्य, हिंदू रक्षक ग्रुपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. 

Mypage

स्नेहलता कोल्हे यांनी शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व महिला व ग्रामस्थांना शुभेच्छा देऊन सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो आणि सर्वांचे जीवन सुखी व आनंदी होवो, अशी प्रार्थना देवीमातेच्या चरणी केली. त्या म्हणाल्या, नवरात्रोत्सव हा आदिशक्तीची उपासना करण्याचा उत्सव असून, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माता-भगिनींना आनंदाचे क्षण मिळावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्व वयोगटातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन स्त्रीशक्तीचा जागर केला.

Mypage

महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मला खूप समाधान वाटले. सन २००० पासून मी महिला बचत गटापासून सामाजिक कार्याला सुरुवात केली. महिला मंडळ व बचत गटात काम करत असताना तुम्ही मला विधिमंडळात पोहोचवले हे मी कधीही विसरू शकत नाही. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना संघटित करून, आर्थिक बचतीचा महामंत्र देत, त्यांचे दु:ख दूर करून त्यांचे जीवन आनंदी कसे बनवता येईल, यासाठी मी सदैव प्रयत्न केले.

Mypage

रडायचे नाही तर हिमतीने लढायचे असा संदेश देत महिलांचा आत्मविश्वास व स्वाभिमान जागृत करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविले. कोपरगाव तालुक्यात हजारो महिला बचत गट सक्षमपणे कार्य करत असून, महिला स्वाभिमानाने व सन्मानाने जगत आहेत, प्रगती करत आहेत याचे मला समाधान आहे. महिला समाजकारण, राजकारण, प्रशासन, कला, साहित्य, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासारख्या अनेक महिला उच्चपदावर सक्षमपणे काम करत आहेत.

Mypage

कोरोनातून मला पुनर्जीवन मिळाले. तेव्हापासून मी माझे जीवन समाजातील दीन-दुबळ्या, दलित, वंचित, उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी समर्पित करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत आहे. महिलांनी संकटाला न घाबरता आत्मविश्वास, एकजूट व हिमतीने प्रगतीची शिखरे सर करावीत. कोपरगाव मतदारसंघातील महिलांसह सर्व समाजघटकांचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आजपर्यंत तुम्ही मला व कोल्हे कुटुंबीयांना जशी साथ दिली तशीच यापुढील काळातही द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Mypage

संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने रवंदे येथे पहिल्यांदाच खास महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अनिता कदम यांनी सर्व महिलांच्या वतीने स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानले. यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे उखाणे, तळ्यात मळ्यात, किसमे कितना है दम, अभिनय व इतर विविध खेळामध्ये सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटला. स्वत: स्नेहलता कोल्हे यांनी या कार्यक्रमात सहभागी होत महिलांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे सादरकर्ते संदीप जाधव यांना गायक किरण वैराळ तसेच अनिल डोरगे, गोरख कोटमे, भरत जाधव, शुभम जाधव, अनिल गाडेकर, प्रमोद निकम, बाळासाहेब जाधव आदींनी संगीताची साथ दिली.  

Mypage

या कार्यक्रमात मंगल कदम, रत्ना नागरे, कोमल नागरे, स्मिता जोशी, साधना गिरी, सुरेखा वाघ, चंद्रभागा वाघ, ज्योती रहाणे, दीपाली भुसे या महिलांना मानाच्या पैठणी तसेच लकी ड्रॉमधील भाग्यवान विजेत्या पूजा दीपक कदम (गॅस शेगडी), ताराबाई घायतडकर (मिक्सर), मंगल घोटेकर (टेबल फॅन), सुनंदा कदम (इस्त्री), अनिता मोरे (डिनर सेट) यांना स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. योगीता बोठे, ऋतुजा गाडेकर, तृप्ती नागरे यांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *