कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०९ : स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ ऑगस्ट रोजी महिला सबलीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
या कक्षाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व या विभागाच्या प्रमुख नीता शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. बी. एस. यादव यांनी आपल्या मनोगतात भारत हा स्त्री शक्तीचा देश आहे.
या समाजात अनेक महापुरुष हे स्त्री मार्गदर्शनामुळे घडले. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी इत्यादी अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलौकिक वाढविल्याचे त्यांनी सांगितले.
समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी महिला विषयक सर्व कायद्याचे ज्ञान त्यांना असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमुद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कक्षाच्या प्रमुख नीता शिंदे यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थिनींना महिला सबलीकरण कक्षाच्या विविध उपक्रमांची तसेच महाविद्यालयातील विद्यार्थीनीच्या सर्वांगीण विकासासाठी हा कक्ष सर्वोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. पी. भावसार यांनी तर आभार प्रा. वर्षा आहेर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला सबलीकरण कक्षाच्या सदस्या डॉ. सुरेखा भिंगारदिवे, प्रा. के. देशमुख, प्रा. येवले, प्रा. गख्खड यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापिका व बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या.