जलयुक्त शिवार अभियानासाठी ग्रामस्थांनी जलसंधारणाची कामे सुचवावीत – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनधी, दि. २७ : जलयुक्त शिवार अभियान-२ अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान-२ मध्ये पहिल्या टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे करण्यात येणार असून, ज्या गावांमध्ये पहिला टप्पा राबविला गेला आहे; पण अद्याप पाण्याची गरज आहे, तेथेही लोकसहभागातून विविध कामे करण्यात येणार आहेत.

जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात कोपरगाव येथील पंचायत समिती सभागृहात कार्यशाळा पार पडल्यानंतर शिवार फेरी काढण्यात येणार असून, अभियानासाठी निवड झालेल्या गावातील लोकांनी शिवार फेरीमध्ये मृद व जलसंधारणाची कामे सुचवावीत, असे आवाहन माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री‎ असताना सन २०१४ ते २०१९ या‎ काळात राज्यात जलयुक्त शिवार‎ अभियान राबवण्यात‎ आले होते. पहिल्या टप्प्यात राज्यातील २२ हजार ५९३ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले व यामध्ये ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण झाली. तसेच २० हजार ५४४ गावे जलपरिपूर्ण झाली. या कामांमुळे २७ लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली. तसेच ३९ लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या.

या अभियानामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली असून, पाणी साठ्यातही भरीव वाढ झाली आहे. हजारो हेक्टर सिंचनासाठी आले असून, शेतीचे उत्पादनही वाढले आहे. जलयुक्त शिवार‎ अभियानाचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेला पुन्हा गती देतानाच ‘जलयुक्त शिवार अभियान-२’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत कोपरगाव तालुक्यातील बोलकी, ब्राह्मणगाव, धारणगाव, चांदगव्हाण, जेऊर पाटोदा, करंजी (बु.), खिर्डी गणेश, कोकमठाण, मळेगाव थडी, मुर्शतपूर, सडे, रवंदे, शिंगणापूर, येसगाव, टाकळी, संवत्सर, सोनारी, नाटेगाव, सांगवी भुसार, माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, सुरेगाव, चासनळी या २३ गावांची निवड झाली आहे. 

जलयुक्त शिवार अभियान-२ च्या संनियंत्रणासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या‎ अध्यक्षतेखाली तर तालुका पातळीवर प्रांताधिकाऱ्यांच्या‎ अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. कोपरगाव तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी माणिकराव आहेर असून, समितीच्या सचिव उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्रीमती खेमनर आहेत, तर तहसीलदार विजय बोरूडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता लाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिंदे हे सदस्य आहेत. जलयुक्त शिवार‎ अभियानांतर्गत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, नवीन साठवण बंधारे, जुन्या साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करण्यात येणार आहेत.

या अभियानासाठी पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक गृहित धरून गाव आराखडा तयार करण्यात येणार आहे. गाव आराखड्यानुसार कामे झाल्यानंतर गावाचा जल परिपूर्णता अहवाल तयार करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात कोपरगाव येथील पंचायत समिती सभागृहात कार्यशाळा झाल्यानंतर शिवार फेरीचे आयोजन केले आहे. हे अभियान कोपरगाव तालुक्यासाठी अत्यंत फायद्याचे असून, ग्रामस्थांनी शिवार फेरीमध्ये सहभागी होऊन आपल्या गावात नवीन साठवण बंधारे, जुन्या साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती व जलसंधारणाची कामे सुचवावीत. तसेच याबाबत काही अडचणी आल्यास कोपरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.

जलयुक्त शिवार‎ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील १०१६‎ गावातून ३२ हजार कामे करण्यात‎ आली होती. त्यामध्ये कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या कोळ नदीचे तत्कालीन आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने  पुनरुज्जीवन केल्याने त्याचा या भागातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. कोपरगाव तालुक्याचा पूर्व भाग हा नेहमीच पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. या भागात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मिळवून कोळ नदीचे पुनरुज्जीवन केले. त्यामुळे पूर्वी गाळाने भरलेली कोळ नदी सध्या वाहती झाली असून, आपेगाव, शिरसगाव, तिळवणी, उक्कडगाव, कासली, कान्हेगाव, वारी, तळेगाव मळे, घोयेगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे.