धार्मिक ग्रंथ विटंबना प्रकरणी आमरण उपोषण, तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाईची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे मुस्लीम धर्मियांचा धार्मिक ग्रंथांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ सकल मुस्लीम समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले. धार्मिक ग्रंथाची विटंबना करणाऱ्या आरोपीस तत्काळ अटक करावी, खोटे आरोप करून धुडगूस घालणाऱ्यांवर कारवाई करावी. भडकावू भाषण करून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

सदर उपोषणास विविध धर्माच्या संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित राहून पाठींबा दर्शविला. सकल मुस्लीम बांधवांनी आपापली दुकाने, आस्थापने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. घटना होऊन दहा दिवस उलटून देखील अद्याप या प्रकरणी अज्ञात आरोपीला अटक झालेली नाही. सकल मुस्लीम समाजाची वतीने २० बांधव उपोषणाला बसले आहेत. प्रशासनाने सदर प्रकरणी कुठल्याही दबावाखाली काम न करता आरोपीला अटक करावी.

खोटे गुन्हे दाखल करू नये, शहरात सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने राहत असताना अशा घटना जाणीवपूर्वक घडविल्या जात आहेत. अशी शंका येते. जो पर्यत आरोपी अटक होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. यावेळी आरपीआयचे दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, मौलाना अब्दुल हमीद, नितीन बनसोडे, ॲड नितीन पोळ, उद्धव ठाकरे सेनेचे माजी शिवसेना शहरप्रमुख भरत मोरे, आदींनी यावेळी पाठींबा दर्शवत मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवसह इतर समाज बांधव उपस्थित होते. पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.