शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : मनुष्याच्या अंगी असलेल्या कला गुणांमुळे त्याच्या जीवनात आर्थिक सुबत्ता व प्रतिष्ठा प्राप्त होत असते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या अंगीभुत कलेचा शोध घेऊन ती कला जोपासण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केले.
येथील स्वरताल संगीत विद्यालयाचे संस्थापक, तथा प्रथितयश गायक जितेंद्र भास्कर यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या सुपर सिंगर आवाज शेवगाव तालुक्याचा या गीत-गायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात युवक नेते कोळगे बोलत होते. दहा दिवसापूर्वी ही स्पर्धा सुरु करण्यात आली. त्यावेळी शेवगाव तालुक्यासह राज्यभरातील दीडशेच्यावर स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
त्यातून प्रथम २४ स्पर्धकांना दूसऱ्या फेरीसाठी निवडण्यात आले. तर २० ऑगस्ट झालेल्या तिसऱ्या फेरीत दहा स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. तर या दहा स्पर्धकातून शनिवारी शेवगावात झालेल्या महासोहळ्यात प्रथम तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्या विजेत्या युवा कलाकारांना पाहूण्यांच्या हस्ते रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यात तालुक्यातील भातकुडगाव येथील अलका शिंदे या अंध युवतीने आपल्या अविष्काराने सर्व स्पर्धकावर मात करत प्रथम पुरस्कार पटकावला तीला अकरा हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले, तर पाथर्डी येथील हरिप्रिया घायाळ हिने सात हजार रुपयांचे दुसरे तसेच रीमा राठोड व रुपेश सोनवणे यांनी पाच हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.
स्पर्धेचा प्रारंभ शिवशाहीर कल्याण महाराज काळे, सिने पत्रकार भगवान राऊत, आंतरराष्ट्रीय सुफी शास्त्रीय गायक पवन नाईक, सिने अभिनेते महेश काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तर पारितोषिक वितरण सोहळा राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कोळगे पंचायत समितीचे माजी सभापती अरुण लांडे, विजयराव देशमुख, आनंद ढोले, अजिंक्य लांडे, देवा पवार, संजय फडके, बापूसाहेब गवळी, डॉ. सुमेध वासनिक, डॉ. गणेश चेके आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. संयोजक जितेंद्र भास्कर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. शेवगाव येथे प्रथमच पार पडलेल्या गायन स्पर्धेसाठी परिसरातील संगीत प्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होते.