आशा कर्मचा-यांना शासकिय दर्जा देण्यात यावा

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०९ : शेतकरी कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनी पुकारलेल्या आंदोलनाला शेवगाव येथे मोर्चा काढून पाठिंबा देण्यात आला. महाराष्ट्रभर आशा कर्मचारी व गट प्रवर्तक कर्मचारी यांनी करोना काळातही तसेच त्यानंतर घरोघरी आरोग्य सेवा देण्याचे काम केले.

परंतु त्यांना आजही तुटपुंज्या मानधनावर उदरनिर्वाह करण्याची वेळ आहे. त्यांना त्यांच्या कामाच्या योग्य मोबदला दिला जात नाही. आशा कर्मचारी यांना ग्रामीण भागात काम करतांना विविध प्रवृत्तींना सामोरे जाण्याची वेळ येते.

राज्यात परभणी, नाशिक, नांदेड आशा विविध ठिकाणी आशा कर्मचाऱ्यावर स्थानिक गावगुंडांचे हल्ले झालेले आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी. आशा व गट प्रवर्तक यांना शासकिय कर्मचा-यांचा दर्जा देण्यात यावा, किमान वेतन देण्यात यावे, त्यांचा भविष्य उदरनिर्वाह निधी त्यांच्या पीएफ खात्यात जमा करण्यात यावा, पेन्शन लागु करण्यात यावी. अशा विविध मागण्यांसदर्भात आशा व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दि.९ ऑगस्टला, क्रांतीदिना निमित्त तहसिलदार प्रशांत सांगडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

सन २०१४ ला भाजप सत्तेवर आल्यापासून, कामगार कर्मचाऱ्याचे प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर होत आहेत. केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे नोकऱ्या धोक्यात आल्या. कामगार संघटनांनी लढून मिळवलेले कामगार हिताचे कायदे रद्द करून, मालक धार्जिणे चार कामगार संहिता तयार करण्यात आल्या. यामुळे कामगार कर्मचाऱ्यामध्ये असंतोष असून, कामगार विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी कामगार कर्मचारी संघटीत झाला आहे.

यावेळी मोर्चात भाजप हटाव, महाराष्ट्र बचाव देश बचाव घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात भाकप राज्यसचीव काॅ. सुभाष लांडे, काॅ. संजय नांगरे, संजय डमाळ, भगवान गायकवाड, गोरक्ष काकडे, सय्यद बाबुलाल, राम लांडे, सुधाकर निळ,

एकनाथ वखरे, अंजली भुजबळ, शमा सय्यद, सुवर्णा देशमुख, मुमताज शेख, शकीला पठाण, सुनिता जाधव, शोभा पंडीत, कवीता बटुळे, काळे आशा, नाकाडे शोभा, वनिता खर्चन, स्वाती क्षिरसागर, शीतल थोरवे, संगीता साबळे आदीसह बहुसंख्य कामगार उपस्थित होते.