युवकांना योग्य दिशा देणे गरजेचे -आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४  :- आपल्या देशाकडे तरुणांचा देश म्हणून पहिले जाते. जगात सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आपल्या देशात आहे. युवकांना योग्य व्यासपीठ देण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिले आहे. आजचा युवक या देशाचे उद्याचे भविष्य असून युवकांना योग्य दिशा देणे गरजेचे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा (शिर्डी लोकसभा) युवक मेळावा नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि.२३) रोजी कृष्णाई बँक्वेट हॉल कोपरगाव येथे पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदार संघातील विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्यामुळे इतर मतदार संघाप्रमाणे कोपरगाव मतदार संघात झालेला विकास देखील ना.अजित पवारांमुळे झाला आहे. भविष्यात मतदार संघाचा अधिकचा विकास साध्य करायचा असेल विकासाला मदत करणारे ना.अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे. ना.अजित यांच्याकडे राज्याच्या विकासाची दूरदृष्टी असल्यामुळे मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयात सहभागी झालो व मतदार संघातील विकास कामांना निधी मिळवू शकलो.

मतदार संघातील अनेक भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश- युवक मेळाव्या प्रसंगी कोपरगाव शहरातील खडकी भागातील राहुल शिरसाट, रवींद्र पवार, छोटू बैरागी, समीर शेख, अजय लोखंडे, पप्पू खरात, सोनू सुराशे, सुनील मोकळ, रोहित काकुळदे, निलेश गुजर, अनप विलास आढाव, दिनेश गाडेकर तसेच पुणतांबा येथील गौरव जाधव, राहुल पऱ्हे, अमर पऱ्हे, ऋषीकेश सोनवणे, ऋषिकेश सोमवंशी, कुणाल हासे,  प्रतिक कबाडे, स्वप्नील कोते, अक्षय सोमवंशी, वाकडी येथील सचिन लहारे, वाल्मिक लहारे, अक्षय लहारे, स्वप्नील कोते, अण्णासाहेब कोते, सचिन शेळके या भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मतदार संघातील रस्ते, आरोग्य, पाणी पुरवठा योजना, एम.आय.डी.सी., हे प्रश्न त्यांच्यामुळेच सुटले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. २०२४ निवडणुकीचे वर्ष, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद यांच्या निवडणुका होणार असून या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून होणार आहे.

त्या निवडणुकात महायुतीने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त मदत आपल्या पक्षाची झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे हाच संदेश आजच्या युवक मेळाव्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक कार्यकत्यांनी घ्यावा असे आवाहन केले. यावेळी आ.किरण लहामटे यांनी देखील युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.