अक्सा मस्जिद व कब्रस्तानचे काम तातडीने सुरु करण्याची राष्ट्रवादीची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : आ.आशुतोष काळे यांनी मुस्लीम समाज बांधवांच्या मागणीची दखल घेवून कोपरगाव शहरातील सर्व्हे क्र. १०५ मधील अक्सा मस्जिद व कब्रस्तानसाठी निधी दिला असून २५ लाख निधीतील या मस्जिद व कब्रस्तानचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे.

त्याबाबत  कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वरजी चाकणे यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सर्व्हे क्र. १०५ परिसरातील मुस्लीम समाज बांधवांना दफण विधी व नमाज पठण करतांना येणाऱ्या अडचणींची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी स्थानिक विकास निधीतून घेवून कोपरगाव शहरातील सर्व्हे क्र. १०५ मधील अक्सा मस्जिद व कब्रस्तानच्या संरक्षक भीत व इतर दुरुस्तीसाठी १० लाख व २५ लाख असा एकूण ३५ लाख रुपये निधी दिलेला आहे.

१० लाख रुपये निधीतील काम प्रगतीपथावर असून २५ लाख निधीतील काम मात्र आजपर्यंत सुरु झालेले नाही. त्यामुळे मुस्लीम समाज बांधवांना येत असलेल्या अडचणीची दखल घेवून तातडीने अक्सा मस्जिद व कब्रस्तानचे २५ लाख निधीतील काम तातडीने सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष जावेद शेख, माजी नगरसेवक फकीर कुरेशी, अजीजशेख, मौलाना मुस्कार, डॉ. झियाशेख, जुनेद शेख, रियाज शेख, परवेजशेख, युसूफ पठाण, आमीन पठाण आदी उपस्थित होते.