कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधला. कोपरगाव शहरातील एस.एस.जी. एम. महाविद्यालय, के. जे. एस. महाविद्यालय तसेच तालुक्यातील ६० विद्यालयांमध्ये सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम ऑनलाईन पाहिला. भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कोपरगाव मतदारसंघात राबविण्यात आला.
यावेळी एस.एस.जी. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य आर. आर. सानप, के.जे. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. यादव, उपप्राचार्य डी. एस. सोनवणे, संतोष पगारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, विजय आढाव, जगदीश मोरे आदि उपस्थित होते.
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी व कोणत्याही समस्येला घाबरू नये. तणावमुक्त राहून परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला दिला.पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मुलांना वेळेच्या नियोजनाविषयी काही कानमंत्र दिले आणि नियोजनाचे महत्व सांगून महत्त्वाच्या सूचना दिल्या.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्याला परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ते आधीच माहिती असते. त्यानुसारच आपण आपले नियोजन करू शकतो. मात्र, त्यात नेमके आधी काय करावे, सुरुवात कुठून करावी हे समजत नाही. त्या विचाराने आपण गोंधळून जातो आणि थकवा जाणवतो. आपल्याला कामाचा थकवा येत नाही. पण एवढी कामे करायची आहेत, या विचारानेच आपण दमतो. त्यामुळे कामांची वाटणी करता येणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अगोदर अभ्यासाचे नियोजन करावे. वेळेचे महत्त्व आणि आपल्याला कोणत्या विषयात आवड आहे हे लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करावे आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा विचार करून ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास’ या त्रिसूत्रीचा अवलंब करणारे पंतप्रधान नरेंद्र लोप मोदी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहता यावे, यासाठी सन २०१८ पासून ‘परीक्षेवर चर्चा’ (परीक्षा पे चर्चा) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.