निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारवर कठोर कारवाई झालीच पाहिजे – विवेक कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : कोपरगाव शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा मिळाव्यात, त्यांचे जगणे सुसह्य व्हावे, अशी आमची भूमिका आहे. नगर परिषदेमार्फत शहरातील रस्ते, गटारी, जलवाहिनी, पेव्हर ब्लॉक अशी जी काही कामे झाली आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ठेकेदार कोणीही असो, कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, जर त्याने निकृष्ट काम केले असेल तर त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी मांडली.

          कोपरगाव नगर परिषदेवरील लोकनियुक्त नगरसेवकांचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात आलेला आहे. तेव्हापासून नगर परिषदेचे मुख्याधिकारी हेच प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. नगर परिषदेच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरवासियांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नगर परिषद प्रशासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकडे हेतूत: दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिक जाम वैतागले आहेत. नगर परिषद प्रशासनाच्या अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

         विवेक कोल्हे म्हणाले, नगर परिषदेमार्फत शहरात झालेली बरीच कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, या कामांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे शासनाचा पर्यायाने नागरिकांनी विविध करांच्या माध्यमातून नगर परिषदेकडे जमा केलेला पैसा मातीत गेला आहे. शहर विकासाच्या दृष्टीने प्रशासनाने नागरिकांना तसेच विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, लहान-मोठे व्यापारी, उद्योजक अशा सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित आहे; परंतु कोपरगाव नगर परिषद प्रशासनाकडून होताना दिसत नाही. न.प. प्रशासन व त्यांचे प्रमुख हे कोणाच्या तरी हातचे बाहुले बनून त्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.

नगर परिषदेच्या वतीने शहरात मागील तीन-चार वर्षांत रस्ते, भूमिगत गटारी, जलवाहिनी, पेव्हर ब्लॉक व इतर अनेक कामे झाली. यातील बऱ्याच कामांचा दर्जा बेसुमार आहे. नागरिकांनी निकृष्ट कामांविषयी तक्रार केल्यानंतर भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी या सर्व कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत तपासणी करून ही कामे दर्जेदार पद्धतीने व्हावी, यासाठी संबंधितांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, त्याकडे नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्षच केल्याचे आता नागरिकांकडून येणाऱ्या वाढत्या तक्रारीवरून दिसत आहे. कोणी तडजोड करून निकृष्ट दर्जाची कामे करत असेल तर ते अयोग्य आहे. यातून जनतेच्या पैशाचाच अपव्यय होत आहे. सार्वजनिक हितासाठी न.प. प्रशासनाने सर्व कामे दर्जेदार व्हावीत याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. 

नागरिकांना पाणी, रस्ते, गटारी, स्वच्छता आदी मूलभूत सुविधा पुरविण्यात नगर परिषद प्रशासन अपयशी ठरले आहे. कोपरगावकरांना दररोज शुद्ध व पुरेसे पाणी हवे आहे; पण गेल्या अनेक दिवसांपासून शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. नगर परिषदेच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरातील पाणी वितरण पूर्णत: कोलमडली आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर नगर परिषद दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. दरमहा कंत्राटदाराला दोन-तीन लाख रुपये देऊनही गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना गढूळ व दूषित पाणी प्यावे लागत आहे. गढूळ व दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य व स्वच्छता विभागाच्या जलशुद्धीकरण. पाणी गळती रोखणे, कचरा संकलन, रस्ते, भूमिगत गटारी व अन्य अनेक कामातही मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी असून, वारंवार तक्रारी व समस्या मांडूनही प्रशासन नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. नगर परिषद प्रशासनाचे चुकीचे नियोजन, अपुरे मनुष्यबळ, तज्ज्ञ, प्रशिक्षित व अनुभवी अधिकाऱ्यांची कमतरता, विविध कामांमधील गैरप्रकार, ठेकेदारांकडून होणारी तकलादू कामे व खाबूगिरीच्या वृत्तीमुळे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालणारे प्रशासन आणि याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. 

नगर परिषदेत पुरेसे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने प्रशासन खाजगी एजन्सीला कंत्राट देऊन अनेक कामे करवून घेत आहे. यावरून न.प. चे खाजगीकरण झाल्याचे दिसत असून, विविध कामाचे कंत्राट देताना मोठा भ्रष्टाचार होत आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेच आता प्रशासक असले तरी त्यांचा वचक नसल्याचे दिसत आहे. त्यातून नगर परिषदेत भ्रष्टाचार बोकाळला असून, जणू ठेकेदारच नगरपालिकेचा कारभार चालवत आहेत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, गटारी आदी समस्यांबाबत न. प. प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार अर्ज, निवेदने देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.

नगर परिषद हद्दीत नव्याने समावेश झालेल्या कोपरगाव ग्रामीणमधील प्रामुख्याने खडकी व लगतच्या परिसरात राहणारे नागरिक आजही पाणी, रस्ते, भूमिगत गटारी आदी सुविधांपासून वंचित आहेत. मागील दीड-दोन वर्षांपासून नागरिकांच्या समस्या सोडविण्याबाबत नगर परिषद प्रशासनास वारंवार निवेदने देऊनही अद्यापपर्यंत कसलीही कार्यवाही झालेली नाही ही शोकांतिका आहे. नागरी सुविधांसाठी नागरिक वारंवार मागणी करत आहेत; पण प्रशासन जर नागरिकांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेत नसेल नागरिकांनी दाद कुठे मागायची, असा सवाल विवेक कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.