वाळुसाठे ठेवलेल्या ९० मालमत्ताधारकांना साडेतीन कोटीचा दंड

दंड न भरणाऱ्यांच्या मालमत्तेचा होणार लिलाव 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६: कोपरगाव तालुक्यातील ९० मालमत्ताधारकांना महसुल विभागाच्या वतीने नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून साडे तीन कोटी रुपये दंडात्मक रक्कम वसुल करण्याची तयारी तहसीलदार विजय बोरूडे यांनी केल्याने वाळु तस्करी करणाऱ्या बरोबर वाळु तस्करीचे वाळु साठे ठेवलेल्या जमीनीच्या मालकांच्या पायाखालची वाळु घसरली आहे. 

 या बाबत तहसीलदार विजय बोरूडे यांनी अधिक माहीती देताना म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन ज्या मालकांच्या शेतात वाळु साठे करण्यात आले होते. त्या त्या शेतकऱ्यांच्या शेतजमीनी ताब्यात घेण्याची अथवा त्या मालमत्ताधारका विरोधात गौण खनिज उत्खनन करुन साठा केल्याच्या कारणावरून महसुल विभागाच्या पथकामार्फत रितसर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती माञ संबधीतांनी वेळेत दंड न भरल्याने वेळोवेळी नोटीसा देवूनही योग्य प्रतिसाद न दिल्याने अखेर शिर्डी विभागीय कार्यालयाने कोपरगाव तालुक्यातील १२ गावामधील ९० शेतकऱ्यावर अर्थात वाळु तस्करांना सहकार्य करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचा लिलाव करुन दंड वसूल करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

तालुक्यातील कोळपेवाडी, कोपरगाव, कोळगाव थडी, चांदगव्हाण, चासनळी, डावूच  बुद्रुक, माहेगाव देशमुख, मळेगाव थडी, मंजूर, मायगाव देवी, सुरेगाव व वेळापूर या १२ गावातील ९० मालमत्ताधारकांची मिळून १०५ हेक्टर ७५ आर इतकी जमीन असुन त्यावर अंदाजे साडे तीन कोटीचा दंड लावण्यात आला आहे. सदरचा दंड येत्या २४ जानेवारी पर्यंत संबधीत मालमत्ताधारकांनी महसुल विभागाकडे भरला नाही तर १५ फेब्रुवारी रोजी सकाळी आकरा वाजता १०५ हेक्टर ७५ आर जमीनींचा थेट लिराव करणार असल्याची माहीती तहसीलदार विजय बोरूडे यांनी जाहीर केल्याने बेकायदा वाळु साठ्यांच्या नादात आडकेलेल्यांची आता बोबडी वळाली आहे.

दंडाची इतकी मोठी रक्कम नाही भरली तर हक्काची जमीन जाण्याची वेळ ९० शेतकऱ्यावर आली आहे. या ९० जनामध्ये अनेक बडे  राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी असल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. तहसीलदार विजय बोरूडे यांनी मालमत्ताधारकांच्या लिलावाची माहीती व नोटीसा बजावताच बेकायदा वाळु उपसा करणाऱ्यांची एकच पळापळ सुरु झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जमीनींचा लिलाव होण्याची तालुक्यातील ही पहीलीच घटना असल्याने सर्वञ या लिलावा बाबत चर्चा सुरु आहे. तहसीलदार विजय बोरूडे यांच्या या धडाकेबाज कारवाईने वाळुतस्करांची झोप उडाली आहे. 

 वाळू तस्करांनी वाळू उपसा करुन जर एखाद्याच्या शेतात वाळू साठा केल्याचे आढळले तर महसुलचे अधिकारी वाळु उपसा करणाऱ्या बरोबर ज्यांच्या शेतात साठा असेल त्या जागेचा मालक अर्थात मालमत्ताधारकावर गुन्हा दाखल करून दंड करण्याची मोहीम राबत आहेत.  तालुक्यातील बेकायदा वाळू साठ्यावर  तहसीलदार विजय बोरूडे यांची करडी नजर असल्याने वाळू तस्करांना वाळु साठे लपवणे कठीण होणार आहे.