वातावरणातील बदलामुळे तालुक्यात रब्बीची पिके धोक्यात

शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : यंदाच्या हिवाळ्यातील सतत बदलते हवामान व ढगाळ वातावरणामुळे तालुक्यात रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. हवामानातील सततच्या बदलामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांवर विविध रोगांचा  प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.

महसूल प्रशासनाने मात्र तालुक्यातील रब्बीच्या ७९ गावातील रब्बी पिकांची नजर आणेवारी ७० पैशा पेक्षा जास्त जाहीर केली आहे. महसूल प्रशासनातील संबधितांनी रब्बीची सुधारित आणेवारी जाहीर करतांना कार्यालयात बसून कागदी मेळ मांडण्यापेक्षा शेतातील पिकांची प्रत्यक्षात पीक पाहणी करून शेतक-यांना दिलासा मिळेल या पद्धतीने सुधारित आणेवारी जाहीर करण्याची अपेक्षा शेतक-यातून व्यक्त होत आहे.     
 
       तालुक्यातील खरिपाच्या ३४ महसुली गावांची अंतिम आणेवारी प्रशासनाने ५० पैशा पेक्षा कमी जाहीर करून शेतक-यांना दिलासा दिला. त्यामुळे आता शासनाच्या विविध सवलतींची प्रत्यक्षात अंमलबजावणी होवून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दिलासा देण्याची तसेच पावसाळ्यात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तातडीने शेतक-यांच्या बँक खात्यात जमा होईल या अपेक्षेने शेतक-यांचे लक्ष लागले आहे.

       तालुक्यात खरिपापेक्षा रब्बीची गावे जास्त आहेत. मात्र रब्बी पिकांची अतिशय दारूण अवस्था झाल्याच्या तक्रारी असल्याने तसेच या पिकांच्या वाढीसाठी हिवाळा अतिशय महत्वाचा आहे. सध्या थंडी गायब असून गेल्या काही दिवसापासून ढगाळ व दुषित वातावरणामुळे रब्बीची पिके धोक्यात आली असतांना प्रशासनाने मात्र रब्बीची नजर पैसे वारी निकषापेक्षा जास्त जाहीर करून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय . स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबत नाराजी व्यक्त करून प्रशासनाने शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून सुधारित आणेवारी जाहीर करून शेतक-यांना दिलासा द्यावा.  अशी मागणी निवेदनाद्वारे केली  आहे.

         याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर शेतक-यांसह रस्त्यावर उतरण्याचा निर्धार जाहीर केला आहे. तालुका प्रशासनाने रब्बीच्या ७९ गावांची गाववार जाहीर केलेली नजर आणेवारी पुढील प्रमाणे – बक्तरपूर (७२ पैसे), रावतळे कुरुड्गाव, भायगाव, मजलेशहर, अंत्रे, देवळाने (७३ पैसे), शेवगाव, खरडगाव, मुर्शतपूर, तळणी, गदेवाडी, दहीगाव शे, विजयपूर, सोनविहीर, देवटाकळी, शहरटाकळी, सुलतानपूर बुद्रुक, घेवरी,  रांजणी, जोहरापूर, खामगाव, मलकापूर, गरडवाडी, आपेगाव, आखतवाडे, माळेगाव ने,  लोळेगाव, वडुले बुद्रुक, आव्हाने खुर्द, शहापूर, आव्हाने बुद्रुक,

ब-हाणपूर, निंबेनांदूर, नांदूर विहीरे (७४ पैसे), अमरापूर, आखेगाव तीतर्फा, डोंगर आखेगाव, भगूर, खुंटेफळ, दादेगाव, घोटण, अंतरवाली खुर्द, अंतरवाली ने, खानापूर, कर्हेटाकळी, बालमटाकळी, चापडगाव, खडके, ठाकूर पिंपळगाव, भातकुडगाव, भावी निमगाव, दहीगाव ने, हिंगणगावने, ढोरजळगाव शे, ढोरजळगाव ने, सामनगाव, वाघोली, वडुले खुर्द (७५ पैसे), सुलतानपुर खुर्द, शहाजापूर, वरूर बुद्रुक, वरूर खुर्द, एरंडगाव, लाखेफळ, ताजनापुर, बोडखे, हातगाव, पिंगेवाडी प्रभूवाडगाव, मडके, लखमापुरी, मुंगी (७६ पैसे), दहिफळ, ढोरहिंगणी, कर्जत खुर्द, कांबी, गायकवाड जळगाव, खामपिंपरी (७७ पैसे)