डॉ. अभिजीत गाढवे यांची डी. एम. न्युरोलॉजिस्ट म्हणून निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगांव येथील डॉ. अभिजीत चंद्रकांत गाढवे यांची राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) मधून मुंबई येथील प्रसिद्ध सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये डी. एम. न्युरोलॉजिस्ट म्हणून शासनातर्फे नुकतीच निवड करण्यात आलेली आहे.

डॉ. अभिजीत गाढवे हे कोपरगांव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी कोपरगांव येथील सेवानिकेतन स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सद्गुरु गंगागिरी महाराज महाविद्यालयातून पूर्ण केले.

या दोन्हीही ठिकाणी त्यांनी प्रथम प्राविण्य मिळविलेले आहे. तर मुंबई (सायन) येथील लोकमान्य टिळक शासकीय महाविद्यालयामध्ये एम. बी. बी. एस. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वैद्यकीय क्षेत्रातील एम. डी. मेडिसिन हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले त्यातही विशेष प्राविण्यासह ते उत्तीर्ण झालेले आहेत.

वैद्यकीय अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल डॉ. गाढवे यांना प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन एअर व्हाईस मार्शल डॉ. राजवीर बलवार यांच्याहस्ते वैद्यकीय क्षेत्रातली महत्वाची समजली जाणारी एम. डी. मेडिसिन (औषध तज्ज्ञ) ही पदवी देखील सप्टेंबर २०२१ बहाल करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा ( नीट ) चांगल्या श्रेणीने ते उत्तीर्ण झाले असून शासकीय कोट्यामधून मुंबई येथील प्रसिद्ध सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये डी. एम. न्युरोलॉजिस्ट म्हणून शासनाने त्यांची निवड केली आहे.

डॉ. अभिजीत गाढवे यांच्या या यशाबद्दल राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त व सचिव डॉ. राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, संचालक राजेंद्रबापू जाधव यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.