भाजपचे कार्यकर्ते बंडूशेठ रासने यांनी आपल्या सर्व पदांचा दिला राजीनामा

शेवगाव प्रतिनिधी, दि.१७ :  शेवगावचे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते सुनील उर्फ बंडूशेठ रामचंद्र रासने व त्यांचे सहकारी यांनी मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात जाऊन आपल्या पदाचे राजीनामे सादर केले आहेत. यामुळे नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अडचणीमध्ये भर पडली आहे.

विदयमान खासदार यांचा गेल्या पाच वर्षात मतदार संघात नसलेला संपर्क कार्यकर्त्यांचे फोन न उचलणे, पक्षात राहून पक्षातील आमदार पाडणे, शेवगाव पाथर्डी मतदारसंघात कुठलेही विकास काम न करणे, आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर साखर आणि डाळ वाटून, लोकांना देवदर्शन घडून आपला केविलवाना जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांचे फोन न उचलणे, जनतेच्या समस्या न ऐकून घेणे, या विदयमान खासदारांच्या प्रवृत्तीला कंटाळून आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत शेवगाव शहर आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपल्या राज्य कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी त्यांच्याबरोबर शेवगाव  शहरातील भारतीय जनता पार्टीचे नवनाथ कवडे, दिलीप सुपारे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते होते.

येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ४०० जागा मिळविलही पण त्यात नगर दक्षिणची जागा नसणार आहे. कारण गेल्या पाच वर्षांमध्ये आठ पैकी भा.ज.प.चे पाच आमदार पाडण्याचे पाप कोणी केले? हे मतदार संघातील लहान मुलाला सुद्धा सांगता येईल. विखेंच्या पाठीमागे जिल्ह्यातील सर्व नेते खंबीरपणे उभे आहेत. परंतु नेता एकीकडे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता दुसरीकडे अशी स्थिती आहे.

या पत्रामध्ये रासने यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचे काम विदयमान खासदार यांनी केल्यामुळे त्यांच्या कार्य शैलीला वैतागून आपण राजीनामे सादर करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.