पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून ‘चला खेडी समृद्ध करू या’ उपक्रमाची सुरुवात – काका कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून ‘चला खेडी समृद्ध करू या’
या उपक्रमाची सुरुवात कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील राघवेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतून करण्यात आली. यावेळी योजनेचे महत्व पटवून देताना ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे बोलत होते. भारतामध्ये ग्रामीण बँकांपेक्षा नागरी सहकारी पतसंस्था व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांना चांगले दिवस येणार आहेत. त्यादृष्टीने सर्व सहकारी पतसंस्थांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून या नव्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी दाखविली पाहिजे.

विशेषतः केंद्र सरकारच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्था व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्र सरकारने घेतलेले आहे. या धोरणाचे आपण सर्वजण स्वागत करू या व या नव्या आव्हानाला सामोरे जाऊ या! असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमा प्रसंगी केले.

या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात कोपरगावचे जेष्ठ कायदे तज्ञ श्याम क्षीरसागर यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १४४ ची माहिती दिली. तसेच कोपरगावचे सुप्रसिध्द चार्टर्ड अकौंटंट दत्तात्रय खेमनर यांनी सहकार कायदा व आयकर या विषयावर व्याख्यान दिले. प्रसंगी राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गोपीनाथ नीलकंठ यांनी उपस्थितांचे स्वागत केले व संचालक सोपानराव चिने, व्हा. चेअरमन सौ.बेबीताई
वारुळे यांनी प्रास्ताविक केले.

या प्रसंगी बोलतांना गोदावरी परिसर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे पंडितराव चांदगुडे यांनी कोपरगाव तालुक्यात साखर कारखानदारी बरोबर सहकारी पतसंस्था चळवळ देखील विकसित झाली आहे. या चळवळीमुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला बळकटी मिळाली असल्याचे प्रतिपादन केले. गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे ज्ञानदेव मांजरे यांनी पतसंस्थांच्या निकोप वाढीसाठी कर्जदारांनी वेळेत कर्ज भरून सहकार्य करावे असे आवाहन केले.

कोपरगाव तालुक्यातील पतसंस्थांच्या वतीने एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडीट युनियनचे संचालक पदी व खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचा सत्कार राजेंद्र निवृत्ती कोळपे (श्री सिद्धेश्वर ग्रा.बि.शेती पतसंस्था कोळपेवाडी ), श्री.पंडितराव चांदगुडे (गोदावरी ग्रा.बि.शेती पतसंस्था), श्री.जयवंतराव रोहमारे (दादा शहाजी रोहमारे ग्रा.बि.शेती पतसंस्था), श्री.ज्ञानदेव मांजरे(गुरुदत्त ग्रा.बि.शेती पतसंस्था), श्री.आशुतोष पटवर्धन (मंदावी नागरी सहकारी पतसंस्था ), श्री विलासराव आव्हाड (कोपरगाव ता.नागरी सहकारी पतसंस्था), श्री.वसंतराव आव्हाड (ओमगुरुदेव ग्रा.बि.शेती पतसंस्था), श्री.किशोर फुलफगर (भाग्यलक्ष्मी पतसंस्था),श्री.आनंदा चव्हाण (श्री.संत जनार्धन स्वामी पतसंस्था), श्री.राधुजी कोळपे (शरद पवार नागरी सहकारी पतसंस्था), श्री.सुभाष गाडे (गणेश ग्रा.बि.शेती पतसंस्था), श्री.चंद्रकांत चांदगुडे (जगदंबा ग्रा.बि.शेती पतसंस्था), श्री.राजेंद्र ढोमसे (शाहाजापूर ग्रा.बि.शेती पतसंस्था),श्री.राजेंद्र बागुल (संजीवनी सहकारी पतसंस्था), श्री.राजेंद्र देशमुख (परिसर ग्रा.बि.शेती पतसंस्था), श्री.सचिन चांदगुडे (कै.जयसिंगअप्पा ग्रा.बि.शेती पतसंस्था), सौ.रोहिणी बोखारे (शृंगेश्वर ग्रा.बि.शेती पतसंस्था) , श्री.शांताराम कदम (शिवशक्ती पतसंस्था ), श्री. प्रभाकर वाणी (भारतीय पतसंस्था), श्री.सुभाष गाडे (श्री.गणेश ग्रा.बि.शेती पतसंस्था), श्री.वसंतराव देशमुख (सिद्धलक्ष्मी पतसंस्था), श्री. शंकर वाणी (साईलक्ष्मी सहकारी पतसंस्था ) यांच्या वतीने करण्यात आला.

या सत्काराला उत्तर देताना काका कोयटे म्हणाले कि, परदेशातील पतसंस्था चळवळीतील चांगले उपक्रम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहोत. तसेच माझी निवड हि कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्था चळवळीचा सन्मान आहे असे मी समजतो.