उत्तम संस्कार देणाऱ्या शाळा समाजाचे खरे वैभव – न्या. जागुष्टे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : येथील  शाळेतील गुणी विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक आम्हाला आमच्या बालपणात घेऊन गेले, मोठे झाल्यानंतर आज पुन्हा एकदा लहान व्हावे वाटले असे संस्कार देणाऱ्या शाळा समाजाचे खरे वैभव ठरतील’, असे प्रतिपादन शेवगाव न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती संजना जागुष्टे यांनी केले.

नानासाहेब भारदे मराठी शाळेत काल पंडीत जवाहरलाल नेहरू  जयंतीनिमित्त बालदिनाचे औचित्य साधून ‘ बालआनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला.या बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन न्या. जागुष्टे यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती व्ही. डोबे, सहदिवाणी न्यायाधीश एम. ए.बेद्रे,सहाय्यक गट विकास अधिकारी दीप्ती गाठ,शेवगाव तालुका बार असोशियनचे अध्यक्ष ॲड.के.के.गलांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

        शाळेतील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला,फळे, नाष्ट्याचे विविध खाद्य पदार्थ विक्रीस ठेऊन त्यातून व्यवहार ज्ञान, व्यावसायिक कौशल्य समजाऊन घेण्याचा प्रयत्न केला. न्या. जागुष्टे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून मनसोक्त खरेदीही केली.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे, सचिव शामकाका भारदे, सहसचिव हरीश भारदे, शाळा समिती अध्यक्षा सौ.रागिणीताई भारदे, ॲड.शैलेश भारदे, प्रा.शिवदास सरोदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन काझी, नसीम पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रोहिणी बोडखे यांनी केले. अश्विनी देशमुख यांनी आभार मानले.