पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, युवा शिवसेना जिल्हाध्यक्षवर गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ :  शेवगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्या प्रकरणी  शिंदे गटाचे युवा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट यांचे विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी ही घटना घडली आहे.

याबाबत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले की, डायल ११२ टॅबवर ड्युटी करिता नेमणुकीस असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नित्यसेवा हॉस्पिटल समोर गाईची तस्करी करणारे वाहन थांबवले आहे, पोलीस मदत हवी आहे. असा कॉल आल्याने फिर्यादी हे घटनास्थळी गेले. तेथील गाईची तस्करी करणारे वाहन तस्करी साठी जात आहे, किंवा कसे याची खात्री करण्यासाठी पोलीस स्टेशन येथे घेऊन येत असताना साईनाथ आधाट यांनी, फिर्यादी पोलीसाच्या मोटर सायकलला, त्यांची मोटरसायकल आडवी लावली.

यावेळी पोलीसाच्या डाव्या कानाखाली जोरात चापटीने मारुन तसेच पोलिसाची कॉलर पकडून मोटासायकल वरुन खाली ओढून रोडवर खाली पाडले. व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून आधाट यांच्या विरोधात शासकीय कामात आडथळा आणणे सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बागुल करत आहेत.

यावेळी ड्युटीवर असलेले कॉ. मोरे गणवेशात नव्हते त्यांनी टेम्पो अडवला असता गोरक्षक साईनाथ आधाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसास बनावट गोरक्षक समजून जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. संबंधित जनावरे विक्रीसाठी बाजारात चालले असल्याची ऑनलाईन तक्रार ११२ या क्रमांकावर पोलिसांना गोरक्षकाने दिली होती.

त्याची दखल घेऊन पोलिस कारवाई करण्यासाठी गेले असता सिव्हील ड्रेस मधील पोलिस आणि गोरक्षक यांच्यामध्ये गैरसमज होऊन हा प्रकार घडल्याच्या प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करत आहेत.