बोधेगाव बीटच्या गुरूजींनी ‘सर्वांसाठी उमेद’ हा स्तुत्य उपक्रम घेतला हाती

शेवगाव प्रतिनीधी, दि.१६ :  शेवगाव पंचायत समितीच्या बोधेगाव बीटच्या गुरूजींनी ‘सर्वांसाठी उमेद’ हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. वाचलेली पुस्तके दान तत्वावर या ग्रंथालयात स्विकारून विदयार्थी, पालक व नागरिकांना वाचनासाठी दिली जातात.

सुमारे पाच महिन्यापुर्वी सुरू झालेल्या उपक्रमाच्या वाचनालयात आतापर्यंत ३०० पुस्तके जमा झाली असून मंगळवारी हातगावच्या प्रा बद्री बर्गे यांनीही दहा पुस्तकाची त्यात भर टाकली.

बोधेगाव बीटचे उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांच्या संकल्पनेतून वाचन चळवळ वृद्धींगत करण्यासाठी गुरूजींचे ‘सर्वांसाठी उमेद’ ग्रंथालय सुमारे पाच महिन्यांपुर्वी सुरू करण्यात आले. वाचलेली पुस्तके दान करा असे आवाहन डॉ. गाडेकर यांनी शाळा भेटीत व सोशल मिडीयावरून शिक्षक, पालक व नागरिकांना केले होते.

त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रा. बर्गे यांनी चैतन्याचे चांदणे, जीवनाचे शिल्पकार, सारांश, शून्य, पुण्यश्लोक मदर तेरेसा, माझा संघर्ष – अॅडॉल्फ हिटलर, हसवा फसवी, लोकमान्य टिळक चरित्र, तुमची ओळख आमच्याशीच, महानतेच्या दिशेने, डाव मांडियेला आदी पुस्तके भेट दिली.

हातगाव येथील जिप शाळेचे शिक्षक विष्णू वाघमारे हे उमेद ग्रंथालयाचे कामकाज पाहत असून वाघमारे यांनी त्यासाठी घरातील एक खोली त्यासाठी मोफत दिली आहे.