लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे शासकीय अनावरण व खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी पाठपुरावा करू – माजी आमदार कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण त्वरित करावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम तातडीने चालू करावे, या मागण्यांसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. आपण व कोल्हे कुटुंबीय कायम मातंग समाजाच्या पाठीशी उभे असून, फकिरा चंदनशिव यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यावर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारून अनेक दिवस उलटले आहेत. तरीही शासनामार्फत अद्याप या पुतळ्याचा अनावरण सोहळा झालेला नाही. तसेच नगर परिषदेच्या अनास्थेमुळे शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे.

नगर परिषद प्रशासनाने खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी जून २०२१ मध्ये संबंधित ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिलेला आहे; पण  ठेकेदाराने अद्यापही हे काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे मातंग समाजात नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे. नगर परिषद प्रशासनाने तातडीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण करावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम चालू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव यांनी मंगळवार (१२ सप्टेंबर) पासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. 

माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी बुधवारी (१३ सप्टेंबर) रात्री भेट देऊन फकिरा चंदनशिव यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी फकिरा चंदनशिव यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. कोल्हे कुटुंबीय सदैव मातंग समाजबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे व आपण स्वत: मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतलेली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण करावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम चालू करावे, या मागण्यांची शासन व प्रशासनाने तात्काळ पूर्तता करावी, यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले. यावेळी भाजप व सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.