वंदे भारत एक्स्प्रेसला कोपरगावला थांबा द्या, आमदार काळेंची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा नुकतीच रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली असून या वंदे भारत एक्स्प्रेसला कोपरगाव रेल्वे स्टेशनला थांबा द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. राऊसाहेब दानवे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

  दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते शिर्डी १० फेब्रुवारीपासून सुरु होणार असून मुंबई, शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नाशिक, ठाणे या मार्गे हि वंदे भारत एक्स्प्रेस जाणार आहे. या प्रवासादरम्यान या एक्स्प्रेसला मनमाड, नाशिक, ठाणे या ठिकाणी अधिकृत थांबा आहे. कोपरगाव तालुक्यातील असंख्य नागरिक नेहमीच कामानिमित्त मुंबई येथे जात असतात.

मात्र मुंबईला जाणाऱ्या या नागरिकांसाठी कोपरगाव येथून आठवड्यातून केवळ एकच रेल्वे एक्स्प्रेस असून त्या एक्स्प्रेसची वेळ देखील रात्रीची आहे. ती एक्स्प्रेस वगळता कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना मुबईला जायचे असल्यास मनमाड येथे जावे लागते. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून मुंबईसाठी नवीन एक्सप्रेस सुरु करावी अशी मागणी रेल्वे प्रवाशांची आहे.

   नव्याने सुरु होणाऱ्या वंदे भारतची बैठक व्यवस्था फक्त बसून जाण्यासाठी करण्यात आली असून रेल्वे प्रवाशांचा प्रवास लवकरात लवकर व्हावा हा यामागे उद्देश असून हि वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला उतरणार आहे. त्यामुळे सहाजिकच कोपरगाव रेल्वे स्थानकाचे आर्थिक उत्पन्न देखील वाढण्यास मदत होणार असून रेल्वे प्रवाशांची मुंबईसाठी नवीन एक्सप्रेस सुरु करावी हि मागणी देखील यानिमित्ताने पूर्ण होणार आहे. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला कोपरगाव रेल्वे स्टेशनला थांबा देण्यात यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. राऊसाहेब दानवे यांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.