धार्मिक स्थळांचा विकास व्हावा यासाठी कोपरगाव मतदार संघाला प्राधान्य द्या – आमदार काळे

कोपरगावप्रतिनिधी, दि.२१ : कोपरगाव मतदार संघातून पवित्र गोदावरी नदी वाहत असून मतदार संघाला मोठा ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील धार्मिक स्थळांचा विकास व्हावा यासाठी जिल्हा धार्मिक पर्यटन आराखड्यात कोपरगाव मतदार संघाला प्राधान्य द्यावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदार संघास धार्मिक व पौराणिक वारसा लाभलेला मतदार संघात अनेक धार्मिक स्थळे आहेत. यामध्ये कोपरगाव येथे नगर-मनमाड महामार्गावर शिर्डीच्या श्री साईबाबांचे तपोभूमी मंदिर, बेट भागात गोदावरी नदीकाठी जगातील एकमेव असलेले श्री गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर, श्री जनार्दन स्वामी महाराज आश्रम, कोकमठाण येथील जंगलीदास महाराज आश्रम,

पुणतांबा येथील श्री चांगदेव महाराज देवस्थान, वाकडी येथील प्रती जेजुरी असलेले श्री खंडोबा देवस्थान, जुनी गंगा देवी, दत्त पार, श्री गोपाजी बाबा देवस्थान, श्री रेणुकादेवी देवस्थान मायगाव देवी, पेशवेकालीन राघोबादादा वाडा इत्यादी धार्मिक, ऐतिहासिक स्थळे आहेत. श्री क्षेत्र शिर्डी जवळ असल्याने शिर्डी येथे येणारे भाविक देखील आवर्जून या धार्मिक स्थळांना भेटी देतात.

 तसेच ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त असलेले वारी येथील श्री रामेश्वर देवस्थान, कान्हेगाव येथील श्री नरसिंह देवस्थान, कोकमठाण येथील लक्ष्मीमाता देवस्थान, पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर देवस्थान, चांदेकसारे येचोल श्री कालभैरव देवस्थान, ब्राम्हणगाव येथील श्री जगदंबा माता देवस्थान, माहेगाव देशमुख येथील श्री अमृतेश्वर देवस्थान, 

कोळपेवाडी येथील श्री महेश्वर देवस्थान, संवत्सर येथील श्री श्रृंगेश्वर ऋषी देवस्थान, कुंभारी येथील श्री राघवेश्वर देवस्थान, चासनळी येथील जगदंबा माता देवस्थान, उक्कडगाव येथील रेणुकामाता देवस्थान इत्यादी मोठी व ग्रामीण भागातील असंख्य नागरिकांची अपार श्रध्दा असेलली विख्यात धार्मिक स्थळे आहेत.

परंतु या धार्मिक स्थळांचा भाविकांना अपेक्षित असलेला विकास झालेला नाही. त्यामुळे भाविकांना व बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना या धार्मिक स्थळी चांगल्या सोयी सुविधा मिळत नाही. कोपरगाव मतदार संघाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मतदार संघातील सर्वच धार्मिक स्थळांचा विकास करणे अत्यंत गरजेचे असून त्यामुळे व्यवसाय वृद्धी होवून आर्थिक उलाढाल वाढणार आहे.

त्यामुळे जिल्हा धार्मिक पर्यटन आराखड्यात कोपरगाव मतदार संघाला प्राधान्य द्यावे. अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली आहे.