उसाला प्रतिटन तीन हजार शंभर रुपये भाव मिळावा यासाठी दोन तास ठिय्या आंदोलन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०४ : गेल्या वर्षीच्या हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन तीनशे रुपये मिळावेत, दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी मिळावा तसेच यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाचे प्रति टन रुपये तीन हजार शंभर प्रमाणे पहिला हप्ता दिल्याशिवाय कोणत्याही कारखान्याने ऊस तोड सुरू करू नये. आदी मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंगळवारी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले.

तहसिलदार प्रशांत सांगडे, नगरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी प्रवीण लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, केदारेश्वर गंगामाई साखर कारखान्याचे प्रतिनिधी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यात साधक-बाधक चर्चा होऊन दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दुसऱ्या हप्त्याच्या रकमे संदर्भात साखर सहसंचालक यांनी परिसरातील कारखान्यांशी चर्चा करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा एकमुखी प्रस्ताव या बैठकीत संमत करण्यात आला.

चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, मच्छिंद्र आरले, आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक शरद शिंदे, तालुकाध्यक्ष मेजर अशोक भोसले, लक्ष्मण विघ्ने, रामेश्वर शेळके, अंबादास भागवत, नवनाथ आधाट, विकास साबळे, अमोल देवडे, माऊली मुळे, शिवाजीराव साबळे, उद्धव मापारी, बाळासाहेब गर्जे, संदीप खरड, संजय टाकळकर, आदि सह ज्ञानेश्वरचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, केदारेश्वरचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गरजे, गंगामाईचे प्रशासकीय अधिकारी अर्जुन मुखेकर, वृद्धेश्वरचे शेतकी अधिकारी कचरे आदींनी सहभाग घेतला.

यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजी मुळे परिसर दणाणून गेला. यंदाच्या पावसाळ्यात तालुका व परिसरात पावसाने ओढ दिल्याने उस      पिकास मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई होऊन त्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी  दसरा दिवाळीसाठी मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला जादा रक्कम मिळावी या रास्त मागणीच्या पाठपुराव्यासाठी साखर कारखान्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी स्वाभिमानीच्यावतीने करण्यात आली असून याबाबत परिसरातील साखर कारखान्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आजचे आंदोलन करावे लागले आहे. एफ.आर.पी.ची. रक्कम ठरविताना तीन हजार शंभर ररुपये साखरेचा भाव गृहीत धरण्यात आला होता. मात्र, मे महिन्यापासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

आज प्रत्यक्षात तीन हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल साखरेचा भाव आहे. तसेच उपपदार्थापासून बाय प्रॉडक्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा हिस्सा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना ज्यादा रक्कम मिळण्यासाठी शासनाने लक्ष घालण्याची गरज यासाठी सदरचे धरणे आंदोलन पुकारण्यात आल्याचे स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष लवांडे, उपाध्यक्ष फुंदे यांनी यावेळी सांगितले. आता साखर संचनालय याबाबत काय भूमिका घेणार? याकडेही परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.