शेवगाव प्रतिनिधी, दि.०४ : आपली संस्कृती ही निसर्गपूजक आहे. शालेय शिक्षणातूनच विद्यार्थ्यांना म्हणजे उद्याच्या भावी नागरिकांना योग्य ते पर्यावरण शिक्षण देणे गरजेचे आहे. बदलत्या आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात निसर्गाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, रोखण्यासाठी शालेय शिक्षणातूनच मुलांचे प्रबोधन व जनजागृती करायला हवी. शाळेतून विद्यार्थी व पालकांचे योग्य समुपदेशन केल्यास पर्यावरण संवर्धन करणे शक्य आहे असे प्रतिपादन भारदे शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे यांनी केले.
येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी गणपती उत्सवानिमित्त शाडू माती पासून सुबक गणेश मूर्ती साकारल्या. या स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. शुभांगी खेडकर, आदित्य घरगणे, आराध्या मुंदाणकर, भक्ती कदम, आदित्य मोरे, अमोघ उरणकर या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने सन्मान चिन्ह व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्राचार्य शिवदास सरोदे, उपप्राचार्य संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक गोकुळ घनवट, उमेश घेवरीकर, सदाशिव काटेकर, अमृत गोरे, सुनील डाखुरकर, सुरेश विधाते, निलेश मोरे, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवकवृंद उपस्थित होते.