जय पराजयापेक्षा जनतेचे हित महत्वाचे – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : निवडणुका येतात आणि जातात. राजकारण फक्त निवडणुकीपुरते त्यानंतर फक्त समाजकारणावर लक्ष केंद्रित करायचे या कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करीत असतांना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चार वर्षात मतदार संघाचा जो विकास करून दाखविला त्या कामाच्या विकासाची पावती व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक निवडणुकीत घेत असलेल्या परिश्रमाचे फळ नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मिळाले असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या काळे गटाचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांबरोबरच सर्व उमेदवारांचा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, निवडणूक कोणतीही असो निवडणुकीत जय-पराजयापेक्षा जनतेचे हित महत्वाचे असते.

आ. आशुतोष काळेंच्या कामाची जनतेकडून दखल – कोपरगाव मतदार संघात २०१९ पूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी लोकप्रतिनिधींना कमी ग्रामपंचायतींची सत्ता मिळाल्याचा आजवरचा अनुभव होता. परंतु २०१९ नंतर पार पडलेल्या अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या आ. आशुतोष काळेंकडे विरोधकांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींची सत्ता आली आहे. त्याबरोबरच निवडून आलेल्या उमेदवारांचे मताधिक्य देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. यावरून आ. आशुतोष काळे यांनी मागील चार वर्षात केलेला विकास हा सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचला असून जनतेने त्यांना त्यांच्या कामाची दखल घेतली असून जनतेचा आशीर्वाद यापुढेही आ. आशुतोष काळेंच्या पाठीवर राहणार असल्याचे यावरून सिद्ध होत आहे.  

त्यामुळे निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी जनतेला अपेक्षित असणारे विकासाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. ग्रामपंचायत स्तरावरील शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थी नागरिकांना मिळवून द्यावा. मागील चार वर्षात कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून मतदार संघातील पाणी, रस्ते, आरोग्य आदी मुलभूत प्रश्न सोडविले आहे. 

 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या काळे गटाचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे.

मतदार संघातील बहुतांश गावातील पाणी योजनांना कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून त्यामुळे महिला भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण कायमची थांबणार आहे. अनेक गावातील रस्त्यांना निधी देवून हे रस्ते प्रमुख जिल्हा मार्गांना जोडले गेल्यामुळे दळणवळणाची समस्या संपुष्टात आली आहे. मतदार संघाच्या उर्वरित विकासाच्या प्रश्नाचा निपटारा लावण्यासाठी माझा पाठपुरावा सुरूच असून हे प्रश्न देखील येत्या काही दिवसात मार्गी लागतील.

नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशातून हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर ठेवावे आणि आपल्या गावातील सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावे असा मौलिक सल्ला आ. आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना दिला. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, सर्व संचालक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नवनिर्वाचित सरपंच,  सदस्य अनेक गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.