दिवाळीचा सण दोन दिवसावर, लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळालाच नाही

शेवगाव प्रतिनिधी, दि.०९ : दिवाळीचा सण दोन दिवसावर आला आहे. मात्र, शेवगाव तालुक्यातील प्राधान्य व अंत्योदय योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना अद्याप आनंदाचा शिधा किट तसेच गहू व तांदूळ मिळाला नसल्याच्या कार्डधारकाच्या तक्रारी आहेत. याबाबत चौकशी करून शासनाच्या सवलत  योजनांचा संबंधित कार्डधारकांना वेळीच पुरवठा करण्यात यावा. अन्यथा मंगळवारी (दि.१४) संबंधित कार्डधारकांसह तहसील कार्यालयातचे उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी करण्याचा अभिनव निर्धार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.

याबाबत वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख शहराध्यक्ष, प्रीतम गर्जे, सलीम जिलानी, रवींद्र नीळ, राजेंद्र नाईक, हाजी मुरा कुरेशी, उत्तम नीळ, यांच्या सह संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांची गुरुवारी येथील तहसील कार्यालयात भेट घेऊन मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. 

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात एकूण १२४ स्वस्त धान्य दुकान आहेत. मात्र, यापैकी काही परवानाधारक हे स्वतः संबंधित धान्य दुकान चालवीत नाहीत. अन्य दुसऱ्याच व्यक्ती त्या चालवितात त्यामुळे याबाबत चौकशी करून जो परवानाधारक दुकान चालवीत नसल्याचे निदर्शनास येईल त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा. शेवगाव शहर व तालुक्यातील बहुतेक शिधा धारकांना गेल्या काही महिन्यापासून त्यांचे मोफत चे धान्य मिळत नाही.

शिधापत्रिका आहे मात्र, ती ऑनलाईन नाही. याबाबत छाननी करून सर्व शिधापत्रिका तातडीने ऑनलाईन करून रेशन कार्ड धारकांची गैरसोय दूर करण्यात यावी. काही विक्रेत्यांना आनंदाचा शिधाच्या किट आवश्यक तेवढ्या देण्यात आल्या नाहीत. अशा विक्रेत्याच्या तक्रारी आहेत. तसेच तालुक्यातील अनेक रेशन विक्रेत्यांना गोरगरिबांसाठी असणारे मोफतचे गहू आणि तांदूळ मिळाले नसल्याने वितरण करताना अडचणी येत असल्याचे संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याबाबतही चौकशी करून रेशन विक्रेत्यांना आवश्यक असलेले आनंदाचा शिधा किट व गहू आणि तांदूळ तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.