पशुधनांमध्ये लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला

शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ : पशुधनांमध्ये अलीकडे विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. मंगळवारी तालुक्यात १९ जनावरे बाधित आढळली असून दुसऱ्या टप्प्यात आत्तापर्यंत ४७५ जनावरांना लंम्पीची बाधा झाली असून त्यापैकी २१४ जनावरे औषध उपचारानंतर बरी झाली आहेत. तर १६ जनावरे मृत्यमुखी पडली आहेत. सध्या २४५ पशुधनावर उपचार सुरू असल्याची माहिती प्रभारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश खेतमाळीस यांनी दिली.

शेवगाव तालुक्यात एकुण पशुधन ७३ हजार ९०० असून तालुक्याच्या पूर्व भागातील सालवडगाव बालमटाकळी खडका मडका आदी गावात बाधित जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळल्याने त्या परिसरात विशेष औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे, या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणापासून वंचित असलेल्या पशुधनाची शोधमोहीम सुरू असून शेवगाव नगरपरिषद व तालुक्यातील ग्रामपंचायत यंत्रणेच्या मदतीने बाह्य कीटक नियंत्रणासाठी तातडीच्या उपायोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासाठी लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळलेल्या परिसरामध्ये तसेच पशुपालकांच्या गोठ्यात आवश्यक ती स्वच्छता ठेवणे व वेळोवेळी फवारणी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. रोगाची माहिती पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तातडीने देऊन बाधित जनावरांचे विलगीकरण गोठ्यांची व परिसराची स्वच्छता याबाबत पशुपालकांना ग्रामसभांच्या माध्यमातून माहिती दिली असून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच बाधित जनावरांच्या उपचार, विलगीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच मृत पशुधनाची विल्हेवाट याबाबत काटेकोर पालन करण्यात येत आहे.

जनावरांच्या वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार जनावरांचा बाजार भरवण्यासंदर्भात प्रतिबंध करण्यासंबंधीचे निर्देश वरिष्ठांच्या सूचने नुसार सर्व संबंधितांना देण्यात आले आहेत. लंम्पी प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात जवळपास दोन हजार पशुधनाला लंम्पीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या ९९ होती, पशुधन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सततच्या परिश्रमामुळे तालुक्यात सुदैवाने लंम्पीचा प्रादुर्भाव वाढला नाही.

वेळीच नियंत्रणात आणण्यात आम्हाला यश मिळाले. आता दुसऱ्या टप्प्यातही या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे सहाय्यक आयुक्त डॉ. कोते जिल्हा पशुशल्य चिकित्सक डॉ. दशरथ दिघे सहाय्यक शल्य चिकित्सक डॉ. मुकुंद राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत याबाबतच्या उपाययोजना तातडीने राबवून लंम्पीचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत अंमलबजावणी करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचेही तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खेतमाळीस यांनी यावेळी म्हटले आहे.