शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : जेष्ठांच्या सन्मान ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. मात्र अलीकडच्या काळात जेष्ठ नागरिकांना वृध्दाश्रमात पाठवून सुरू झालेली, त्यांची अवहेलना ही संस्कृती व देशाच्या सामाजिक अध:पतनाची नांदी असल्याचे प्रतिपादन प्रथितयश व्याख्याते अविनाश भारती यांनी केले.
येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात माजी नगरसेवक सागर फडके मित्रमंडळ व साम्राज्य ग्रुपच्या वतीने जेष्ठ नागरिक दिनानिमित्त स्नेहमेळावा व ‘आधार बनू या आधारवडाचा’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारती बोलत होते.
यावेळी आ. राजळे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरीकांच्या समाजाकडून व कुटूंबाकडून फारशा अपेक्षा नसतात. मात्र त्यांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे असते. प्रत्येक शासकीय कार्यालयात ज्येष्ठ नागरीकांची कामे प्राधान्याने करावीत यासाठी संबंधीत विभाग प्रमुखांना तशा सुचना देण्यात येतील.
शहरात ज्येष्ठ नागरीकांसाठी जाँगींग ट्रँक, सांस्कृतिक केंद्र उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यासाठी निधी देखील उपलब्ध झाला आहे. राजकारण विरहीत विविध सामाजिक व आगळ्यावेगळ्या उपक्रमांमुळे सागर फडके यांचे शहरातील समाजकारणात मोठे योगदान आहे. त्याचा फायदा शहरातील सर्व स्तरातील नागरिकांना होत आहे.
झिंजुर्के महाराज म्हणाले की, महाराष्ट्राला मातापित्यांच्या सेवेची मोठी परंपरा असताना राज्यातील वाढते वृध्दाश्रम हे समाजासाठी व राज्यासाठी भुषणावह नाही. दोन पिढयातील अंतर वाढल्याने मतभेद तर होणार आहेत. पण ज्येष्ठ नागरीकांच्या प्रती आदर व प्रेमभाव कायम जिवंत ठेवला पाहीजे.
यावेळी ज्येष्ठ नागरीकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी शहरातील जेष्ठ नागरिक फिरस्ता संघ, गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक राधेशाम तिवारी यांनी तर सुत्रसंचालन दिपक कुसळकर यांनी केले, तर सागर फडके यांनी आभार मानले.