लुंबिनी बुद्ध विहार रस्त्याचे काम तातडीने सुरू करा, राष्ट्रवादीचे निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. यामध्ये कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांबरोबरच लुंबिनी बुद्ध विहाराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी दिला असून या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे अशा आशयाचे निवेदन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आले आहे.

 दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोपरगाव शहराच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून शहरातील विविध विकास कामे मार्गी लागली असून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्यांनी दिलेल्या निधीतून अनेक रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेल्या आहेत तसेच कोपरगाव शहरातील लुंबिनी बुद्ध विहाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला देखील प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

खराब रस्त्यामुळे लुंबिनी बुद्ध विहाराकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलचे शहराध्यक्ष रावसाहेब साठे, कार्याध्यक्ष प्रकाश दुशिंग, किरण बागुल, प्रकाश बोरसे, संतोष गोरे, अक्षय पवार, नितीन शेलार, सरोज कोपरे आदी उपस्थित होते.