मुख्यमंत्री साहेब, रस्ता होत नसेल तर हेलिकॉप्टर घेण्यासाठी अनुदान द्या

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ : रस्ता म्हणजे विकासाच्या धमन्या आहेत. रस्ता नसेल तर शिक्षणात, उद्योग व्यवसाय करण्यात अडचणी येतात. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न अलिकडे ऐरणीवर आला आहे. गेल्या आठवड्यात लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी रस्त्यासाठी केलेले उपोषण चांगलेच गाजले. शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील एक निवृत्त लष्करी जवान शहरातून थेट आपल्या खेड्यातील शेतीवर विकासाची स्वप्ने घेऊन वास्तव्याला आले. मात्र येथील त्यांच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्त्याचे मोठे हाल आहेत. 

देशाच्या सैन्य दलातून आल्यामुळे सर्वांचे सहकार्य मिळेल या अपेक्षेने त्यांनी स्थानिक प्रशासनाला अर्ज विनंत्या केल्या.  मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी गांधीगिरी करत थेट मुख्यमंत्र्यांकडे आपणास रस्ता नसल्याने हेलिकॉप्टर खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री या जवानाच्या मागणीला कसा प्रतिसाद देतात याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

    तालुक्यातील सालवडगाव येथील रहिवासी, सेवा निवृत्त लष्करी जवान दत्तू भापकर यांनी आपल्या वस्तीवर जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्याने प्रशासनाने हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी सरकारी अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

       सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आनंदी व सुखा समाधानात जावे अशी कोणाचीही इच्छा असणे स्वाभाविक आहे. मात्र तालुक्यातील सेवानिवृत्त लष्करी जवान दत्तू भापकर यांना वेगळ्या प्रकारचा अनुभव आला.  ते सालवडगाव येथील हनुमान वस्तीवर राहतात. मात्र या वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे या वस्तीवरील कुटुंबियांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे.

         वस्तीवरील पंधरा-वीस मुले वस्तीवरून गावात शाळेला जातात. मात्र या मुलांना काट्या कुटयातून, दगड धोड्यातून, प्रसंगी चिखलातून शाळेला जाण्यायेण्याची कसरत करावी लागते.  तसेच वस्तीवरील कोणीही रात्री अपरात्री आजारी पडले तर त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेणे अत्यंत अवघड होते. वस्तीवरील एका वृद्धाचे नुकतेच निधन झाले. यावेळी सुरु असलेल्या पावसामुळे शेवगावाहून अंत्यसंस्कारासाठी आणलेला त्या वृद्धाचा मृतदेह वस्तीवरील नागरिकांना अक्षरश: तीन  किलो मीटरचे अंतर चक्क पाठीवरून त्यांच्या घरी न्यावा लागला. केवळ रस्ता उपलब्ध नसल्याने अशा एक नी अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

सध्या रस्त्यावर तसेच वस्तीकाठच्या  नदी बंधा-यांना मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने आपल्याला घरी येण्या जाण्यासाठी रहदारीचा रस्ता नाही. तरी येथे रस्ता व्हावा म्हणून भापकर यांनी अनेकदा महसूल प्रशासनाकडे दाद मागितली असतांना आपल्या मागणीचा विचार करण्यास कुणाही जबाबदार व्यक्तीला वेळ नसल्याने हेलिकॉप्टरचा पर्याय सोपा असल्याने आता राज्य प्रशासनाकडून हेलिकॉप्टर खरेदीसाठी मदत व मार्गदर्शन मिळण्यासाठी सेवा निवृत्त लष्करी जवान भापकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे लक्ष वेधले असून आता त्यांच्या या उपरोधक मागणीबाबत संबधित विभागाकडून कोणत्या प्रकारची कार्यवाही होणार याकडे संबधित सेवानिवृत्त लष्करी जवान भापकर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व परिसराचे लक्ष लागले आहे.