शेती महामंडळ कामगारांच्या समस्या तातडीने सोडवा – स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० :  कोपरगांव विधानसभा मतदार संघात शेती महामंडळाचा विस्तार मोठया प्रमाणात झालेला होता. मात्र शेती महामंडळ बंद होवुन सदरचे शेती क्षेत्र खंडकरी शेतक-यांना वाटप झाले आहे. शेती महामंडळात कार्यरत असणा-या कामगारांच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच प्रलंबित पडलेल्या आहेत त्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

  कोल्हे पुढे म्हणाल्या की, शेती महामंडळ बंद झाल्याने त्या कामगारांचे थकीत वेतन, त्यांचे प्राव्हीडंट फंड रक्कम तसेच ग्रॅज्युएटीची रक्कम अद्याप मिळालेली नाही, यातील बहुतांश कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेले आहेत मात्र त्यांना अजुनही पेन्शनचा लाभ मिळालेला नाही परिणामी दैनंदिन चरितार्थ चालवण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे.

या कर्मचा-यांना अजुनही निवासासाठी जागा देखील नाही, त्याबाबत आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत. शेती महामंडळाकडील जमिनीतून किमान दोन गुंठे जागा संबंधीत कामगारांना घर बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी व सर्व प्रलंबित समस्या सोडवाव्यात असेही कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.