दहा कोटी विकास निधीचे आमदार काळे यांनी श्रेय लाटू नये- दत्ता काले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ :  कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील विविध वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेखाली तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी स्तरावर वेळोवेळी बैठका घेऊन शहर विकासाचे प्रस्ताव दिले त्यात शिंदे फडणवीस शासनाने दहा कोटी रुपयांचा विकास निधी नुकताच मंजूर केला, मात्र त्याचे श्रेय आमदार आशुतोष काळे व त्यांचे सहकारी लाटत आहे, हा केवीलवाणा प्रकार आहे असे पत्रक भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

ते म्हणाले की, आमदार आशुतोष काळे हे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी त्याच त्याच बातम्यांचे भांडवल करतात. कोपरगाव शहर विकासात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुलेनाट्यगृहाचे काम अन्य विकास कामे मोठ्या प्रमाणात रखडले आहे. मग त्यासाठी आमदार काळे यांना निधी का आणता आला नाही, हा देखील संशोधनाचा विषय आहे.

भाजपच्या नेत्या, तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी २०१४ ते २०१९ या पाच वर्षात प्रामाणिक प्रयत्न करून त्यासाठीचे सर्व प्रस्ताव पालिका स्तरावरील सर्व जबाबदार अधिकारी यांच्या बैठका घेऊन प्रस्तावातील त्रुटी दूर करत शासन स्तरावर देऊन त्याचा नगरविकासमंत्री तसेच जिल्हाधिकारी स्तरावर पाठपुरावा केला, शिर्डी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमातही मुख्यमंत्र्यांसमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष याबाबत वस्तुस्थिती मांडण्यात आली होती, त्याचेच हे फळ आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोपरगाव शहरासह विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामाच्या प्रस्तावाबाबत स्नेहलता कोल्हे या सातत्याने काम करतात, शहरातील अंतर्गत रस्ते चकाचक करण्यासाठी वेळोवेळी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून धुळगाव ही प्रतिमा पुसली आहे, वर्षानुवर्षे रखडलेले प्रस्ताव मार्गी लावले.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेत विकास कामांसाठी निधी हमखास मिळतो पण त्यासाठी पाठपुरावा लागतो. शासन निर्णय प्र. क्र.१७१ धोरण २०१७, दि. १७ नोव्हेंबर २०१७, तसेच ३० सप्टेंबर २०२० यानुसार राज्यातील नगरपरिषदांसाठी लागू असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेचे निकष व सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. त्यानुसार हा दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, तेव्हा आमदार काळे यांनी आपल्यामुळेच निधी मिळाला हे सांगून शहरवासीयांची दिशाभूल करू नये वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे देखील जनतेला अवगत करावे.

संपूर्ण राज्यभरातील नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेअंतर्गत निधी दिला जातो त्यात काळे यांचे कुठलेही कर्तुत्व नाही, अशा योजना व्यतिरिक्त त्यांनी कुठले प्रस्ताव देऊन ते मंजूर करून निधी आणले हे शहरवासीयांना नेमकेपणाने सांगावे असे ते शेवटी म्हणाले.