शेवगाव प्रतिनिधी, दि.०६ : निरपेक्ष भावनेने केलेली जनसामान्याची कामे कधीच निरर्थक ठरत नाहीत. समाजासाठी आपण जेवढे कराल त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने समाज तुम्हाला या ना त्या रुपाने परत करत असतो. या त्रिकालबाधित सत्याचे प्रत्यंतर तालुक्यातील खरडगाव येथे पहायला मिळाले. खरडगाव हे जुन्या पिढीतील दिवंगत ज्येष्ठ नेते कॉम्रेड अचपळ लांडे व दिवंगत आमदार कॉ. वकिल लंघे व एकनाथ भागवत यांच्या संस्काराचा व विचाराचा वारसा लाभलेले गाव आहे.
आज ही गावावर पुरोगामी विचाराचा पगडा असून याच मुशीत येथील सरपंच भगवान डावरे हे खंदे कार्यकर्ते तयार झाले आहेत. गावकी साठी पदरमोड करत रात्रनदिवस झटणारा कार्यकर्ता असा त्यांचा लौकिक आहे. कोविड काळात पथ्य न सांभाळता कोविड योद्धा म्हणून बिनदिक्कत केलेल्या कार्याचा त्यांना फटका बसला. त्यामुळे याच काळात त्यांना अॅन्जीओ प्लॅस्टी करावी लागली. त्यातून समाजाच्या आशीर्वादाने ते ठणठणीत बरे झाले. गेल्या वर्षी खरडगाव ग्राम पंचायतीची निवडणूक झाली तेव्हा ग्रामस्थांनी डावरे यांना आग्रह करून लोकनियुक्त सरपंच पदासाठी परत उभे करून रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यांनी निवडून आणले.
पण त्यांच्या नशीबाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांना म्युकस मायकोसीस झाला. गेली दोन महिने ते पुण्याला रुग्णालयात उपचार घेऊन बरे होऊन काल घरी परतले. तेव्हा आपल्या लाडक्या सरपंचा बद्दलचे गावकर्यांचे प्रेम उफाळून आले. त्यांना थेट घरी जाऊ न देता रस्त्यातच आडवून प्रथम त्यांना नवा पोषाख घालून औक्षण करुन यथोचित सन्मानित करण्यात आले. नंतर तोफाची सलामी देऊन फटाक्यांची आतषबाजी करत डीजेच्या तालात मिरवणुकीने डावरे यांना मोठ्या जल्लोषात त्यांच्या घरी पोहचविण्यात आले. डावरे यांच्या निरपेक्ष कामाचे हे फलित होते. यावेळी ग्रामस्थांच्या आपुलकीने डावरे कुटूंब भारावले होते.