गोदाकाठच्या वटवृक्षाच्या सावलीत बचत गटाच्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम – पुष्पा काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगावच्या पवित्र भूमीत माजी आमदार अशोक काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या व अस्सल गावरान मेव्याचा आस्वाद मिळणाऱ्या ‘गोदाकाठ महोत्सवाचा’ वटवृक्ष बहरत असून या गोदाकाठच्या वटवृक्षाच्या सावलीत बचत गटाच्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा मा. पुष्पा काळे यांनी केले.

महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा, महिला मंडळ कोपरगाव तसेच राज्य शासनाच्या महिला विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गोदाकाठ महोत्सव २०२४’ चे उदघाटन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, आ. आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोपरगावचे भूषण, सुरेल आवाजाची जादुगर सारेगमप लिटिल चॅम्प्स विजेती गौरी अलका पगारे हिच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी त्या बोलत होत्या. तत्पूर्वी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टपर्यंत भव्य दिव्य ‘प्रभू श्रीराम रथयात्रा’ काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रदर्शन करून  कोपरगावकरांना मंत्रमुग्ध केले. तसेच यावेळी कोपरगाव शहरातील सर्व महिला मंडळांचा सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक देखील काढण्यात आली होती.

पुढे बोलतांना पुष्पा काळे म्हणाल्या की, मागील वर्षी २०२३ चा गोदाकाठ महोत्सव संपताच २०२४ च्या गोदाकाठ महोत्सवासाठी तीस ते चाळीस टक्के बुकिंग झाले होते व उर्वरित बुकिंग मागील दोन महिन्यात पूर्ण झाले यावरून बचत गटाच्या महिलांचे गोदाकाठ महोत्सवावर असलेले प्रेम अधोरेखित होते. यापुढील काळातही स्पर्धेच्या युगात महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाचे योग्य पध्दतीने ब्रँडिंग आणि पॅकेजिंग होणे गरजेचे आहे .त्यामुळे त्यांना जास्तीत नफा मिळण्यास मदत होणार आहे.

त्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यशाळा आयोजित करून महिला बचत गटांना वेळोवेळी प्रशिक्षण देवून त्यांना भविष्यातील व्यवसायाचे आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. त्या माध्यमातून यशस्वी महिला उद्योजक म्हणून कोपरगावच्या हजारो महिला आपला नावलौकिक कमावतील असा विश्वास पुष्पा काळे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, संलग्न संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला मंडळे व बचत गटांच्या सदस्या, शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.