कोल्हे साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजी संधान यांचे निधन 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : कोपरगाव येथील इंदिरा पथ भागातील रहिवासी तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजी आनंद संधान यांचे शुक्रवारी (५ जानेवारी २०२४) सायंकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांचे ते वडील होत. शिवाजी संधान यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

नासिक जिल्ह्यातील दहिवाडी (ता. सिन्नर) हे शिवाजी संधान यांचे मूळ गाव. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा. कोल्हे परिवाराशी त्यांचे कौटुंबिक व अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्यात तसेच कोळपेवाडी येथील कोपरगाव सहकारी साखर कारखान्यात काही काळ सेवा बजावली होती.

संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीचे ते विश्वस्त होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना कोपरगाव येथे राहत्या घरी आणण्यात आले होते. अखेर शुक्रवारी (५ जानेवारी) सायंकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. रात्री ८.३० वाजता कोपरगाव येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी, शैक्षणिक, अध्यात्मिक, व्यापार, उद्योग, क्रीडा आदी सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

शिवाजी संधान यांच्या निधनाबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष  विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. शिवाजी संधान यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खदायक व धक्कादायक असून, त्यांच्या अकाली निधनाने कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहाने एक हितचिंतक व ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे.

शिवाजी संधान यांनी सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने सामाजिक व सहकार क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. संधान कुटुंबीयांच्या दुःखात कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समूह सहभागी आहे. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो आणि संधान परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत त्यांनी बिपीन कोल्हे व कोल्हे परिवार तसेच संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने शिवाजी संधान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.