पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांना निवेदन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : शेवगावला नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना, पंचायत समिती व नगरपरिषदेचा पाणीपुरवठा विभाग तसेच सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे होईल यासाठी काम करणे आवश्यक असल्याच्या सूचना प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी दिल्या.

        गेल्या काही दिवसापासून पुन्हा बारा ते पंधरा दिवसातून नळपाणी पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे शहरवासीयांना सुरळीत पिण्याचे पाणी मिळावे त्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी पाटेकर यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पाटेकर यांनी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तसेच नगरपरिषद व सर्व संबंधितांकडून पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत माहिती घेऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. 

शेवगावकरांच्या या समस्येची दखल घेऊन आमदार मोनिकाताई राजळे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शहरासाठी ८२ कोटी रुपये खर्चाच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेला शासन दरबारी मान्यता मिळविली. मात्र प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने पाणी संघर्ष समिती तसेच वेगवेगळ्या माध्यमातून झालेल्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला काही प्रमाणात सुरुवात झाली. मात्र कामाला वेग नसल्याने अनेकांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाणीपुरवठा योजनेच्या कामाला वेग येईल या दृष्टीने काम करणे आवश्यक असल्याच्या भावना बोलून दाखवल्या.

      प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार राहुल देशमुख यांच्याशी संपर्क साधण्यात आला चर्चेत माजी नगरसेवक तथा भाजपाचे प्रदेश सचिव अरुण मुंडे, कमलेश गांधी, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, प्रेमसुख जाजू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, भूषण देशमुख, श्याम कनगरे, सुरज लांडे, संजय नांगरे, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता पूर्वा माळी, शरद लांडे आदींनी सहभाग घेतला,