लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज – स्नेहललता कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०१ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरी व साहित्याच्या माध्यमातून वंचित, शोषित, पीडित, दीन-दलित, कष्टकरी, कामगार यांच्या व्यथा-वेदना मांडून जनजागृती, समाजप्रबोधन व समाजपरिवर्तनाचे मोठे काम केले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, श्रमिक-दलितांच्या चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. आपण सर्वांनी अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श जोपासत त्यांचे प्रेरणादायी विचार पुढे घेऊन जाण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित आज मंगळवारी स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे स्मारक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले. तसेच सर्व समाजबांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, थोर समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. कथा, कादंबरी, पोवाडे, लोकगीते व कलापथकाच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे काम त्यांनी केले. रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा पोवाडा गाणारे ते पहिले लोकशाहीर होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात अण्णाभाऊ साठे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अण्णाभाऊंचे साहित्य हे परिवर्तनवादी व प्रबोधनवादी आहे.

आजही त्यांचा विचार मानवतेकडे घेऊन जाणारा आणि एकता, समता, स्वातंत्र्य, न्याय प्रस्थापित करणारा आहे. विज्ञानवाद जागवणारा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी अण्णाभाऊंचा विचार आत्मसात करून वाटचाल करणे खूप गरजेचे आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम कोपरगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला.

स्व. कोल्हे यांनी वाटेगाव येथील जुन्या-जाणत्या मंडळींच्या मदतीने या महामानवाच्या पुतळा निर्मितीसाठी सर्व माहिती घेऊन, रेखाटन करून अण्णाभाऊंचा दिमाखदार पुतळा तयार करून घेतला व कोपरगाव येथे भव्य स्मारक उभारले. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अण्णाभाऊंचे पुतळे उभारले गेले.  

स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा, स्मारक, खुले नाट्यगृहाचे नामकरण करण्याबरोबरच मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला. स्व. कोल्हेसाहेबांनी व बिपीनदादा कोल्हे यांनी मातंग समाजाला कोपरगावच्या नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

स्व. कोल्हेसाहेबांपासून मातंग समाजबांधवांचे कोल्हे परिवाराशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आजही ते कायम आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य महान असून, नवीन पिढीने अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी स्नेहलता कोल्हे यांनी रिपाइंचे तालुकाध्यक्ष फकिरा चंदनशिव, यांनी आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमास तसेच अण्णाभाऊ साठे, मालवाहतूक मालक-चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप निरभवणे यांनी आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देऊन जयंतीनिमित सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक, स्वप्नील निखाडे, विजय आढाव, शिवसेनेचे नेते कैलास जाधव, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, रिपाइंचे नेते दीपकराव गायकवाड, माजी नगरसेवक जनार्दन कदम, दिनेश कांबळे, शिवाजीराव खांडेकर, जितेंद्र रणशूर, गोपीनाथ गायकवाड, राजेंद्र बागुल, रवींद्र रोहमारे, सोमनाथ म्हस्के, उत्तमराव सोळसे, सुखदेव जाधव, बाळासाहेब सोळसे, अर्जुन मरसाळे, जयेश बडवे,

दीपक जपे, अल्ताफभाई कुरेशी, खालिकभाई कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, सद्दामभाई सय्यद, बाळासाहेब जोशी, हाशमभाई शेख, सतीश रानोडे, शंकर बिऱ्हाडे, अनिल जाधव, जगदीश मोरे, सुजल चंदनशिव, राजेंद्र साळवे, प्रभुदास पाखरे, रवींद्र पोळ, सतीश साबळे, उद्धवशेठ विसपुते, नसीरभाई सय्यद, दिलीप तुपसैंदर, संजय तुपसैंदर, विक्रांत सोनवणे, विजय चव्हाणके, शरद त्रिभूवण,सिद्धांत सोनवणे, सुरेश मरसाळे, संतोष साबळे, सेवेकरी राखपसरे आदींसह मातंग समाजबांधव, भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.