कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०१ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ओव्हरलोड वीज रोहित्रामुळे कृषी पंपांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नव्हता. त्याबाबत नवीन वीज रोहीत्रासाठी निधी मिळावा, यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील ९ वीज रोहीत्रांसाठी जिल्हा नियोजन विभागाने ५० लक्ष निधी मंजूर केला, असल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकास करताना रस्ते, पाणी, आरोग्य या बरोबरच विजेच्या समस्या देखील सोडविल्या असून, ओव्हरलोड वीज रोहित्रामुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नवीन वीज रोहीत्रांना निधी मिळावा. यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता. वीज हा शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असून, कृषी पंपांना नियमित पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा व्हावा, हि प्रत्येक शेतकऱ्यांची अपेक्षा असते.
परंतु मतदार संघातील अनेक वीज रोहित्र ओव्हरलोडमुळे कायम नादुरुस्त होत, असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेवून यापूर्वी देखील ओव्हरलोड वीज रोहीत्रांवर असलेला लोड कमी करण्यासाठी नवीन २८ रोहित्रांना मंजुरी मिळवून १ कोटी अठरा लाख रुपये निधी मिळविला आहे.
परंतु अजूनही अनेक वीज रोहित्र ओव्हरलोड असल्यामुळे, या वीज रोहीत्रांवरील लोड कमी करण्यासाठी नवीन वीज रोहीत्रांना निधी मिळावा यासाठी आमदार काळे यांचा पाठपुरावा सुरूच होता. त्या पाठ्पुराव्याची दखल घेवून, जिल्हा नियोजन विभागातून मतदार संघातील ९ वीज रोहीत्रांसाठी ५० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. हे रोहित्र चास नळी, धोत्रे, पोहेगाव बु. (२), भोजडे, माहेगाव देशमुख, मुर्शतपूर रांजणगाव देशमुख, संवत्सर या गावात बसविले जाणार आहेत.
त्यामुळे या गावातील ओव्हरलोड वीज रोहीत्रांवर असलेला लोड कमी होण्यास मदत होवून, शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने सुरळीत वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्याबद्दल या गावातील शेतकऱ्यांनी आमदार काळे यांचे आभार मानले आहे. मतदार संघातील ९ वीज रोहीत्रांसाठी जिल्हा नियोजन विभागाने ५० लक्ष निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार व महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांचे आमदार काळे यांनी आभार मानले आहे.