शेतकऱ्यांना पूर्वीच्या निकषाप्रमाणे अनुदान द्यावे- साहेबराव रोहोम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०१ : गतवर्षी संततधार पावसाने नुकसान झालेल्या कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव, दहेगाव (बोलका), रवंदे व कोकमठाण या चार मंडळातील एकूण २१०६३ लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य शासनाने २३ कोटी ५१ लाख ९९ हजार रुपये अनुदान मंजूर केले आहे. शासनाने यापूर्वी संततधार पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे, जे निकष व दर ठरवले होते, त्यात बदल करून आताचे हे अनुदान मंजूर केल्याची माहिती आहे.

मात्र, शासनाने कसलाही भेदभाव न करता पोहेगाव व सुरेगाव या सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई दिली. त्याप्रमाणेच कोपरगाव, दहेगाव (बोलका), रवंदे व कोकमठाण या सर्कलमधील शेतकऱ्यांनादेखील त्वरित अनुदान वाटप करून दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांनी केली आहे.

साहेबराव रोहोम म्हणाले, गेल्या वर्षी म्हणजे सन २०२२ मध्ये कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडले होते.

आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, यासाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे, तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

अखेर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त व संततधार पावसाने नुकसान झालेल्या, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेऊन, यासाठी निधीही मंजूर केला. शासनाच्या निर्णयानुसार कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व सुरेगाव या दोन मंडळांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी २७ हजार रुपये, व फळबाग क्षेत्रासाठी हेक्टरी ३६ हजार रुपये याप्रमाणे आर्थिक मदत मिळाली आहे. मात्र, कोपरगाव, दहेगाव (बोलका), रवंदे व कोकमठाण या सर्कलमधील संततधार पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळालेली नाही. 

सरकारने पोहेगाव आणि सुरेगाव या दोन सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे आर्थिक मदत मंजूर केलेली आहे, त्याच निकषानुसार कोपरगाव, दहेगाव (बोलका), रवंदे व कोकमठाण या सर्कलमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही तात्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी रोहोम यांनी केली आहे. शासनाने कोपरगाव, दहेगाव (बोलका), रवंदे व कोकमठाण या मंडळांतील संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकूण २३ कोटी ५१ लाख ९९ हजार ६७९ रुपये, इतके अनुदान मंजूर केले आहे.

या चार मंडळांतील २१०६३ शेतकऱ्यांना संततधार पावसाचा फटका बसलेल्या २९३.६५ हेक्टर, जिरायत क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीसाठी सुमारे २४ लाख ९६ हजार रुपये, बागायतीच्या १३,६१४.४२ हेक्टर, क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीसाठी २३ कोटी १४ लाख ४५ हजार ६३ रुपये तर ५५.९४ हेक्टर बारमाही (बहुवार्षिक) क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीसाठी १२ लाख ५८ हजार ६१३ रुपये असे एकूण २३ कोटी ५१ लाख ९९ हजार ६७९ रुपये अनुदान शासनाने मंजूर केले आहे.

सरकारने जिरायती शेतीच्या नुकसानीसाठी ८ हजार ५०० रुपये व बागायतीसाठी १७ हजार रुपये व बारमाही पिकांच्या (फळबागांच्या) नुकसानीसाठी २२ हजार ५०० रुपये याप्रमाणे या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला असून, दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

शेतीच्या नुकसान भरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात लवकरच जमा केली जाणार आहे. मात्र, हे आर्थिक अनुदान देताना शासनाने कोणताही भेद्भाव करू नये, या आधी पोहेगाव व सुरेगाव या सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई दिली त्यानुसारच कोपरगाव, दहेगाव (बोलका), रवंदे व कोकमठाण या सर्कलमधील शेतकऱ्यांनादेखील त्वरित अनुदान वाटप करून त्यांना दिलासा द्यावा, असे साहेबराव रोहोम यांनी म्हटले आहे.